मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासाठी परवानगी न घेता व्यासपीठ उभारण्याबरोबरच महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यास विरोध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कांही पदाधिकाऱ्यांना आज पोलीस ठाण्यात बोलावून नोटिसा देण्यात आल्या.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गेल्या 30 डिसेंबर 2021 रोजी टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी व्हॅक्सिन डेपो येथील सार्वजनिक रस्त्यावर व्यासपीठ उभारले आणि सभा आयोजित केली.
त्याचप्रमाणे परवानगी न घेता उभारलेले व्यासपीठ काढा म्हणून सांगण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यास विरोध केला असा आरोप ठेवून महापालिकेच्या उपकार्यकारी अभियंता मंजुश्री मंजन्ना यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी म. ए. समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर भा.द.वि. 143, 283, 341, 353 व 149 कलमान्वये गुन्हे दाखल केले.
यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांना आज सोमवारी सकाळी टिळकवाडी पोलीस ठाण्यात बोलावून नोटिसा देण्यात आल्या.
सदर पदाधिकाऱ्यांनी प्रमाणे इतरांनाही पोलीस ठाण्यात बोलावून नोटीसही देण्यात येणार असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांसह जवळपास 28 जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.