टिळकवाडी दुसऱ्या रेल्वे गेटनजिकच्या श्री मारुती मंदिराशेजारी आढळून आलेल्या एका निराधार आजारी वृद्ध इसमाला सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात देऊन त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केल्याची घटना आज सकाळी घडली.
याबाबतची माहिती अशी की, आज पहाटे कचरा गोळा करणाऱ्या शारदा, भारती आणि माया या महिलांना दुसऱ्या रेल्वे गेट येथील श्री मारुती मंदिराशेजारी दुकानाच्या पायरीवर एक 60 ते 65 वर्षाचा निराधार आजारी वृद्ध इसम झोपलेला आढळून आला.
सदर वृद्धाच्या पायांना सूज येण्याबरोबर तो अशक्त झाला होता. अंगावर पुरेसे कपडे नसलेल्या त्या वृद्धाला नीट बोलताही येत नव्हते. तेंव्हा कचरा गोळा करणाऱ्या महिलांनी थंडीपासून बचाव व्हावा म्हणून त्या वृद्धाला स्वतः कडील शाल देऊ केली.
हा सर्व प्रकार तेथून जाणारे टिळकवाडीतील समाज सेवक प्रसाद कुलकर्णी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्वरित सामाजिक कार्यकर्ते हेल्प फाॅर निडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर त्यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. अनगोळकर यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांनी ताबडतोब टिळकवाडीतील सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांना मारुती मंदिरकडे पाठविले.
दरेकर यांनी लागलीच टिळकवाडी पोलिसांना वृध्दाबाबत कल्पना दिली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून संबंधित वृद्धाला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्याची व्यवस्था केली. याकामी संतोष दरेकर यांना समाजसेवक प्रसाद कुलकर्णी व चहा स्टॉल चालक नारायण गावडे यांचेही सहकार्य लाभले.