बेळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे नूतन पोलीस उपायुक्त म्हणून रवींद्र गडादी यांची नियुक्ती करण्यात आली असून आज मंगळवारी त्यांनी आपल्या अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली.
बेळगावचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांची बढतीपर शिमोगा येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर नूतन पोलीस उपायुक्त म्हणून रवींद्र गडादी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेळगाव पोलीस आयुक्त मुख्यालयातील कार्यालयामध्ये आज मंगळवारी बेळगाव गुन्हे आणि रहदारी विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी नूतन पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी याना त्यांच्या अधिकारपदाची सूत्रे बहाल केली. त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्याबरोबरच त्यांना शुभेच्छाही दिल्या.
राज्यातील 16 पोलीस अधीक्षकांच्या (बिगर आयपीएस) गेल्या शनिवारी बदल्या करण्यात आले आहेत. त्यात बेळगाव जिल्ह्यातील बेळगावचे पोलीस आयुक्त डाॅ. के. त्यागराजन आणि पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांचाही समावेश होता. या उभयतांची बदली झाल्यामुळे आता बेळगावच्या नूतन पोलीस आयुक्तपदी डॉ. एम. बी. बोरलिंगय्या तर पोलीस उप आयुक्तपदी रवींद्र गडादी यांनी कार्यभार हाती घेतला आहे.