संपूर्ण लॉकडाऊन टाळायचा असेल तर नागरिकांनी सध्या पंधरा दिवसांसाठी जारी केलेल्या निर्बंधांना आणि विकेन्ड लॉकडाऊनला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन कर्नाटकचे मंत्री अश्वत नारायण यांनी केले आहे.
बेळगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. संबंधित निर्बंध लादण्यात आल्या नंतर या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते. एकंदर संपूर्ण लॉकडाऊन करणे हे नागरी हिताच्या आणि व्यापारी धोरणाच्या दृष्टीने घातक आहे.
यामुळे रुग्ण संख्या कमी होण्याच्या दृष्टीने आपण विकेंड लॉकडाऊन करून योग्य ती खबरदारी घेण्याचा निर्णय सरकारी पातळीवर घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात विशेष तज्ञ समितीची बैठक घेऊन काही प्रमाणात शैथिल्य ठेवून विकेंड कर्फ्यु लागू केला असून नागरिकांनी आता चांगला प्रतिसाद देण्याची गरज अश्वत नारायण यांनी व्यक्त केली.
कोविड नियमावलीचे राष्ट्रीय पातळीवरील आणि राज्याने जारी केलेले नियम लक्षात घेऊन नागरिकांना आता जबाबदारीने वागायला हवे. मास्क सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर या गोष्टींचा वापर केल्यास कोविड आणि ओमीक्रॉन चा धोका टाळण्यासाठी मदत होईल. अशी माहिती त्यांनी दिली.