बेळगाव जिल्ह्यातील दुग्धोत्पादनात चांगली वाढ झाली असून गत वर्षभरात दररोज 35 हजार लिटर दुधाचे उत्पादन होत असल्याची नोंद झाली आहे. त्याप्रमाणे गत पाच वर्षात जिल्ह्यातील दुग्धोत्पादनात 80 हजार लिटरची वाढ झाली आहे.
महागाई, पीक नुकसान, अतिवृष्टी आदी कारणांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सध्या पशुपालनाचा जोडव्यवसाय आर्थिक हातभार लावणारा ठरला आहे. चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पशु संगोपनावर भर दिला आहे.
राज्य सरकारने पशु भाग्य योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जनावरे खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करुन दिले आहे. तसेच जिल्ह्यातील विविध संस्था, सहकारी दूध उत्पादन संघटना आणि बँकांकडून जनावरे खरेदीसाठी कर्ज सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे दरवर्षी पशु संगोपनात 18 टक्क्यांनी वाढ नोंदवली जात आहे. परिणामी दुधाचे उत्पादन देखील वाढले आहे.
बेळगाव जिल्ह्यात दररोज 16 लाख लिटर दूध उत्पादन होत असून यापैकी सुमारे 1 लाख 15 हजार ते 2 लाख लिटर दूध कर्नाटक मिल्क फेडरेशनला (केएमएफ) जाते. उर्वरित दूध जिल्ह्यातील विविध संस्था, गोवा आणि महाराष्ट्रातील खाजगी संस्थांना जाते. चांगला दर आणि बोनस मिळत असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या दुधाची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनामुळे लॉक डाऊनच्या काळात हॉटेल, शाळा, महाविद्यालय, निवासी शाळा बंद राहिल्या होत्या. त्यामुळे दुधाचा व्यावसायिक वापर थांबला होता, तरीदेखील दुग्धोत्पादनात 3 टक्के वाढ झाली होती.
दरम्यान, पशु संगोपन खात्याचे सहसंचालक डॉ. ए. के. चंद्रशेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 2 वर्षात पशु संगोपन आणि दुग्धोत्पादनात वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी आणि मजुरांना पशु संगोपनाचा आर्थिक हातभार लागत आहे. जिल्ह्यात रोज 16 लाख लिटर दूध उत्पादन होत असून कर्नाटकसह गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या तीन राज्यात जिल्ह्यातील दूध पाठवले जाते.