मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीची सगळी जबाबदार माणसं बाहेर आहेत. त्यामुळे मला ठाम विश्वास आहे की माझी मुलंच नव्हे तर अटक झालेली सर्व मुले सहीसलामत हिंडलगा कारागृहातून बाहेर येतील, असा ठाम विश्वास ज्येष्ठ सीमा सत्याग्रही, सीमा तपस्वी रामा शिंदोळकर यांनी व्यक्त केला आहे. समितीच्या महिला कार्यकर्त्या साधना पाटील आणि शिवानी पाटील यांच्यासमोर त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
बेंगलोर येथे छ. शिवाजी महाराजांच्या मूर्ती विटंबनेच्या घटनेनंतर बेळगावमध्ये निषेध नोंदवण्यात आला. मात्र पोलिसांनी निष्पाप तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना हिंडलगा कारागृहात डांबले असून यामध्ये सीमा तपस्वी रामा शिंदोळकर यांच्या दोन मुलांचाही समावेश आहे.
दोन्ही कर्ती मुले जेलमध्ये असल्याने वयस्क शिंदोळकर यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा धीर देण्यासाठी समितीच्या महिला कार्यकर्त्या साधना पाटील आणि शिवानी पाटील यांनी कोनवाळ गल्ली येथील निवासस्थानी त्यांची काल शुक्रवारी भेट घेऊन विचारपूस केली. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अटकसत्र हाती घेऊन बेळगावातील ज्या निरपराध मराठी युवकांवर खोटे गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली, त्या युवकांमध्ये सीमा तपस्वी रामा शिंदोळकर यांच्या सुरज आणि बळवंत या दोन मुलांचाही समावेश आहे.
आपल्या भेटीसंदर्भात शिवानी पाटील बेळगाव लाईव्हला माहिती देताना म्हणाल्या की, वयोवृद्ध सीमा सत्याग्रही म्हणून आम्ही रामा शिंदोळकर यांची भेट घेण्यास गेलो होतो. मात्र त्यांचा आत्मविश्वास इतका प्रचंड होता की त्यांनी आम्हालाच धीर दिला असे म्हणायला हरकत नाही. त्यांचा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीवर इतका विश्वास आहे की मध्यवर्तीयची सगळी जबाबदार माणसं बाहेर आहेत. त्यामुळे मला ठाम विश्वास आहे की माझी मुलं नव्हे तर अटक झालेली सर्व मुले सहीसलामत बाहेर येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्या दिवशी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास माझ्या मुलांना पोलिसांनी घरात घुसून ताब्यात घेतले रात्री-अपरात्री पोलिसांनी येऊन दिलेला हा त्रास आता वयानुसार मला सहन होत नाही. एखाद्या सभ्य माणसासोबत असा प्रकार होणे चुकीचे आहे अशी खंतही रामा शिंदोळकर यांनी व्यक्त केल्याचे शिवानी पाटील यांनी सांगितले.
रामा शिंदोळकर यांचा स्वतःसह महाराष्ट्र एकीकरण समितीवरील दृढ विश्वास पाहून भारावलेल्या शिवानी पाटील व साधना पाटील यांनी त्यांना काहीही मदत लागली तर आम्हाला कळवा, असे सांगितले. मात्र त्यांनी कसलीही अपेक्षा केली नाही किंवा घडलेल्या घटनेबद्दल कोणालाही दोष दिला नाही. सुरज आणि बळवंत शिंदोळकर हे दोघे हिंडलगा कारागृहात आहेत. त्यांना आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांची चिंता लागून राहिली आहे. तथापि न्यायालयात त्यांची भेट घेताना निस्वार्थ आणि तितक्याच कणखर वृत्तीच्या रामा शिंदोळकर यांनी उलट आपल्या मुलांनाच आमची काळजी करू नका. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, असा सल्ला दिला. शिंदोळकर यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि समिती नेत्यांवर ठाम विश्वास असून आपली सर्व मुले सुखरूप जेलमधून सुटतील असे त्यांना वाटते.