महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेते, विचारवंत, पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीचे अग्रगण्य नेते तसेच बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी भागाच्या सीमा प्रदेशातील मराठी जनतेचे नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच मध्यवर्ती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी तात्काळ कोल्हापूरला धाव घेऊन एन. डी. साहेबांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले
कोल्हापूर येथील ॲपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये आज दुपारी बारा -सव्वा बाराच्या सुमारास लढ्यातील मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते भाई एन. डी. पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, तालुका युवा समितीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, दत्ता उघाडे, महेश जुवेकर, बाबू कोल्हे, सुनील आनंदाचे आदींनी तात्काळ कोल्हापूरला धाव घेतली. या सर्वांनी ॲपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये जाऊन एन. डी. साहेबांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.
अंतिम दर्शनानंतर प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, एन. डी. साहेबांच्या निधनामुळे आम्हा सीमाभागातील मराठी माणसांचा आधारस्तंभ हरपला आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंब जसे वाऱ्यावर पडते तसा आता सीमाभाग वाऱ्यावर पडू नये असे मला वाटते. 1956 पासून सातत्याने हा प्रश्न सुटावा यासाठी साठी एन. डी. पाटील साहेब यांनी केलेले प्रयत्न साऱ्या महाराष्ट्र व सीमाभागाला माहित आहेत. आपल्या हयातीत सीमाप्रश्न सुटावा आणि बेळगाव महाराष्ट्रात सामील व्हावे अशी त्यांची इच्छा होती मात्र दुर्दैवाने ती पूर्ण होऊ शकले नाही. त्यांच्या निधनामुळे सीमावासियांचा फार मोठा आधार हरपला आहे असे सांगून आज 17 जानेवारी हुतात्मा दिनी त्यांच्या निधनाची बातमी कळाली त्यामुळे सीमा प्रश्नासाठी आणखी एक हुतात्मा एन. डी. पाटील यांच्या रूपाने झाले आहेत असे म्हंटल्यास चुकीचे होणार नाही, असेही किनेकर म्हणाले
प्रकाश मरगाळे यांनी एन. डी. पाटील हे सीमा भागाचे ‘पितामह’ होते, असे सांगितले. आज आम्ही पोरके झालो आहोत. सीमाप्रश्न सुटायचा असेल तर एन. डी. साहेबांसारखी माणसे पाठीशी हवीत सीमाभागातील मराठी जनतेच्या प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी ते मदतीला धावून आले आहेत. त्यांना फक्त एक फोन केला की सीमा भागातील अडचणी दूर होत असतात त्यांचे निधन ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे सीमाभाग पोरका झाला आहे, असे मरगाळे म्हणाले.
आता उद्या मंगळवार दि. 18 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. कोरोना संदर्भातील निर्बंध लागू असल्यामुळे हा अंत्यसंस्काराचा विधी फक्त 20 जणांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र तत्पूर्वी उद्या सकाळी 8 वाजल्यापासून एन. डी. साहेबांचे पार्थिव कोल्हापुरातील शाहू कॉलेजच्या आवारात जनतेला अंतिम दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.