कर्नाटक राज्यात कन्नड व उर्दू माध्यमांनंतर मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्टुडंट अचीव्हमेंट ट्रॅकिंग सिस्टिम अंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये गेल्या 2020 -21 या वर्षात तब्बल 1 लाख 9 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
शिक्षण खात्याच्या सर्वेक्षणानुसार 2020 -21 मध्ये राज्यातील विविध माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये नव्याने 1 लाख 9 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून कर्नाटकात कन्नड व उर्दू नंतर मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
2020 -21 च्या स्टुडन्ट अचीव्हमेंट ट्रॅकिंग सिस्टिमअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली असली तरी मराठी शाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची नावे नोंदवली गेली आहेत. बेळगाव सीमा भागातील 1 हजार 272 शाळांमध्ये 1 लाख 9 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ही मराठी शाळांसाठी अतिशय चांगली बाब आहे.
बेळगाव, खानापूर, चिकोडी, कागवाड, निपाणी या भागातील शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. दुसरीकडे तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटली असून सर्वेक्षणानुसार 2020 -21 मध्ये या शाळांमध्ये कमी प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे असला तरी सीमाभागातील मराठी भाषिक आणि आजही मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यास प्राधान्य दिले असल्याचे यावरून स्पष्ट होते.
यापुढे अधिकाधिक पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवून देत मराठी शाळांना पुन्हा ‘अच्छे दिन’ येण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. दरम्यान, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सततच्या सीमा आणि भाषिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश वाढला आहे असे सर्वेक्षणात नमूद असून सीमाभागातील मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना कन्नड भाषा येत नसल्याचेही या सर्वेक्षणात पुढे आले आहे. या भागातील विद्यार्थ्यांना कन्नड शिकण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे.