बेळगाव शहरातील कपलेश्वर मंदिर येथे रस्त्याशेजारी फुटपाथवर असहाय्य अवस्थेत बसलेल्या एका निराधार वृद्ध महिलेला निराश्रितांच्या निवारा केंद्रात आसरा मिळवून देण्याचे उदात्त कार्य केल्याबद्दल एका गरीब होतकरू विद्यार्थ्याला महेश फाउंडेशनचे प्रमुख महेश जाधव यांनी आज नवी कोरी सायकल बक्षिसादाखल देऊन गौरविले.
याबाबतची माहिती अशी की, पृथ्वीराज पी. श्रेयकर हा वडगाव येथे राहणारा कॉलेज विद्यार्थी कॉम्प्युटर कोर्स शिकण्यासाठी दररोज चन्नम्मा सर्कलपर्यंत पायी ये -जा करतो. आई वडिलांचे छत्र हरपलेल्या पृथ्वीराजची घरची परिस्थिती बेताची असून तो आपल्या चुलत भावासोबत राहतो.
त्यामुळे स्वतः काम करून तो आपले शिक्षण घेत आहे. काल नेहमीप्रमाणे पृथ्वीराज आपल्या कॉम्प्युटर क्लासला जाऊन परतत असताना त्याला कपिलेश्वर मंदिराजवळ फुटपाथवर एक निराधार वृद्ध महिला असहाय्य अवस्थेत बसलेली दिसली. त्याने लागलीच याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते फेसबुक फ्रेंडस सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांना दिली. तसेच दरेकर आणि त्यांचे सहकारी रुग्णवाहिका घेऊन येईपर्यंत पृथ्वीराज त्या महिलेजवळ थांबून राहिला. त्यानंतर संबंधित वृद्धेला रुग्णवाहिकेतून खासबाग येथील निराश्रितांसाठी असणाऱ्या सरकारी निवारा केंद्रात येऊन दाखल करण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आई -वडील नसल्याचे दुःख काय असते याची जाणीव असलेला पृथ्वीराज श्रेयकर हा सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत शेवटपर्यंत थांबला होता. आई -वडिलांचे छत्र हरपलेल्या गरीब कष्टाळू पृथ्वीराज याने त्या निराधार वृद्धेला आसरा मिळावा यासाठी केलेली धडपड पाहून प्रभावित झालेल्या दरेकर यांनी सोशल मीडियावर त्याच्याबद्दल प्रशंसा करणारी पोस्ट टाकली होती. ती पाहून महेश फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे प्रमुख महेश जाधव यांनी तात्काळ संतोष दरेकर यांच्याशी संपर्क साधला.
तसेच पृथ्वीराज यांच्या उदात्त कार्याची दखल घेऊन आज शनिवारी आपल्या संस्थेतर्फे त्याला त्याच्या कॉम्प्युटर क्लास आणि इतर कामांसाठी पायपीट करावी लागू नये यासाठी नवी कोरी सायकल बक्षिसादाखल देऊ केली. याप्रसंगी संतोष दरेकर यांच्यासह फाऊंडेशनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सायकल बक्षिसादाखल दिल्याबद्दल पृथ्वीराज श्रेयकर याने महेश फाउंडेशन आणि दरेकर यांचे आभार मानून यापुढे देखील आपण अशीच समाजासाठी कार्य करतच राहू, अशी ग्वाही दिली.