कर्नाटक विधान परिषद सदस्यपदी निवड झालेल्या नूतन सदस्यांचा शपथविधी सोहळा येत्या गुरुवार दि. 6 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता विधानसौध बँक्वेट हॉलमध्ये होणार असल्याची माहिती विधान परिषदेचे उपसचिव बी. ए. बसवराजू यांनी दिली आहे.
राज्यातील 25 विधानपरिषद जागांसाठी गेल्या 10 डिसेंबर रोजी मतदान झाले आणि 14 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत 12 मतदार संघात भाजप आणि 11 मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले.
त्याचप्रमाणे उर्वरित दोन जागा निजद आणि अपक्षांनी जिंकल्या. बेळगावच्या द्विसदस्यीय मतदारसंघात काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी आणि अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी विजयी झाले.
हे दोघेही विधान परिषदेवर प्रथमच निवडून गेले असल्यामुळे बेंगलोर येथील त्यांच्या शपथविधीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.