खानापूर तालुक्यातील कुसमळी गावानजीक राज्य महामार्ग क्र. 54 वर असलेला प्रमुख ब्रिज अत्यंत अरुंद असल्यामुळे या ठिकाणी अवजड वाहने अडकून पडण्याच्या घटना सातत्याने घडत असून सदर ब्रिजचे युद्धपातळीवर नूतनीकरण करून रुंदीकरण केले जावे, अशी जोरदार मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
कुसमळी (ता. खानापूर जि. बेळगाव) गावानजीक राज्य महामार्ग क्र. 54 वर असलेला ब्रिज अत्यंत अरुंद आहे. या रस्त्यावरून बेळगाव होऊन चोर्ला घाटातून गोव्याला जाण्यासाठी वाहनांची कायम ये-जा सुरू असते. कुसमळी गावानजीकच्या मलप्रभा नदीवरील या पुलाची गेल्या कित्येक वर्षापासून दुरुस्ती अथवा नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे हा ब्रिज अद्यापही पूर्वीच्या अरुंद अवस्थेत आहे. परिणामी पूल ओलांडताना वाहनचालकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते. एकमेका समोरून येणाऱ्या ट्रक सारख्या अवजड वाहनांनी यदाकदाचित एकाच वेळी हा ब्रिज ओलांडण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही वाहने ब्रिजवर अडकून पडणार हे ठरलेले आहे.
यापूर्वी ब्रिजवर अवजड वाहने या ब्रिजवर अडकून पडल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूला वाहतुकीची मोठी कोंडी होऊन वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. काल मंगळवारीच या ब्रिजवर दोन ट्रक एकमेकांमध्ये अडकून पडले.
यामुळे सदर मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन ब्रिजच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या पद्धतीने वाहने अडकून पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा तर होतच आहे शिवाय अडकून पडलेली वाहनांचे एकमेकांची घर्षण होत असल्यामुळे त्यांचे नुकसान ही होत आहे.
दरम्यान, भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी या ब्रिजच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ब्रिजचे लवकरात लवकर नूतनीकरण व्हावे यासाठी पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कुसमळी ब्रिजच्या नूतनीकरणासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ब्रिज बांधकामांचा आराखडाही तयार केला जात आहे. त्यामुळे कांही महिन्यात निविदा काढून ब्रिजचे बांधकाम सुरू होणार असल्याचे समजते. तथापि अलीकडे सदर ब्रिजवर वाहने अडकून पडण्याच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे नेहमी चोर्ला मार्गे ये-जा करणारे वाहन चालक त्रस्त झाले असून या ब्रिजचे युद्धपातळीवर नूतनीकरण केले जावे अशी त्यांची मागणी आहे. विशेष करून खानापूरच्या आमदारांनी या ब्रिजकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.