हुतात्मा दिनाचे औचित्य साधून खानापुर तालुक्यातील हुतात्मा नागाप्पा होसुरकर यांच्या पत्नी श्रीमती नर्मदा नागापा होसुरकर यांना मराठी बांधवांच्यावतीने साडी -चोळी आणि आर्थिक मदत देण्यात आली.
सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या बहुतांश हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची परवड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी गो शाळेचे अध्यक्ष भरमानी प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करबळ ग्रा. पं. उपाध्यक्ष नारायण पाटील, कौंदल गावचे ग्रा. पं. सदस्य उदय नारायण भोसले, विनायक सुतार, यलापा नलवडे आदींनी मंडळींनी आज 17 जानेवारी हुतात्मा दिनाचे औचित्य साधून खानापूर तालुक्यातील हुतात्मे नागाप्पा होसुरकर यांच्या पत्नी श्रीमती नर्मदा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच त्यांची विचारपूस करून साडी चोळी देऊन त्यांना गौरविण्याबरोबरच आर्थिक मदत देखील देऊ केली.
यावेळी बोलताना भरमाणी पाटील त्यांनी सांगितले की, भाषावार प्रांतरचनेमध्ये झालेल्या अन्यायाच्या विरोधात 17 जानेवारी 1956 रोजी छेडण्यात आलेल्या आंदोलनाप्रसंगी खानापुरात नागप्पा होसुरकर यांनी हौतात्म्य पत्करले. बालविवाहाची प्रथा असणाऱ्या त्याकाळात आपल्या पतीच्या निधनाप्रसंगी नर्मदा या अवघ्या दहा वर्षाच्या होत्या.
अल्पावधीत आपल्या पतीचा मृत्यू कशासाठी झाला हे समजताच त्यांनी तेंव्हापासून गेली 65 वर्ष वैधव्य स्वीकारले आहे. सीमाप्रश्नासाठीच्या त्यांच्या या त्यागाची जाणीव सर्वांनी ठेवावयास हवी असे सांगून सीमाप्रश्न सुटावा आणि आपल्या समस्त मराठी भाषिकांनी महाराष्ट्रात जावो अशी वयोवृद्ध नर्मदा यांची इच्छा आहे, असे पाटील यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे श्रीमती नर्मदा होसुरकर यांच्या त्यागाची जाणीव ठेवून प्रत्येक मराठी भाषिक नेत्याने सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कार्य करावे. यासाठी प्रथम खानापूर तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांमध्ये तात्काळ एकी व्हावी अन्यथा येत्या 19 फेब्रुवारी रोजी पत्रक काढून मराठीभाषिक वेगळा निर्णय घेतील असेही भरमानी पाटील यांनी स्पष्ट केले.