बेळगाव शहराच्या प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या खडेबाजार या प्रमुख बाजारपेठेच्या मार्गावर अलीकडे मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरू झाला आहे. त्यामुळे ही बाजारपेठ आहे की ‘रेड लाइट एरिया’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करून शहराला बदनाम करणारा हा प्रकार थांबवावा, अशी जोरदार मागणी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
खडेबाजार ही बेळगाव शहराची प्रमुख बाजारपेठ आहे. या मार्गावर विविध प्रकारची दुकाने, आस्थापने, हॉटेल्स, शोरूम, हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळे दिवसभर हा मार्ग खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी गजबजलेला असतो. मात्र अलीकडे मध्यवर्ती बसस्थानकापासून ते शितल हॉटेलपर्यंतच्या या मार्गावर वेश्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. गिर्हाईक जाळ्यात ओढण्यासाठी या वेश्या अश्लील हावभाव आणि संवाद करत असतात. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 20-25 वेश्या राजरोसपणे या ठिकाणी आपला धंदा करत आहेत.
वेश्यांच्या सुळसुळाटामुळे बाजारपेठेवर परिणाम होऊ लागला असून चांगले ग्राहक खडेबाजार येथे जाण्यास टाळू लागले आहेत. वेश्यांच्या अश्लील व अर्वाच्य भाषेमुळे या ठिकाणी वारंवार तंटे -भांडणाचे प्रकार घडत आहेत. त्याचप्रमाणे या भागातील गृहिणी आणि युवतींना रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. वेश्या समजून घरंदाज महिलांना दर विचारले जात असल्यामुळे हमरातुमरीचे प्रकार घडत आहेत.
वेश्यांनी खडेबाजार येथे इतका हैदोस घातला आहे की याठिकाणी दुकानांमध्ये कामाला येणाऱ्या सेल्सगर्ल मुलींची मोठी कुचंबना होत आहे. सकाळी कामावर हजर राहण्यासाठी येणाऱ्या मुलींना दुकान उघडेपर्यंत बाहेर थांबावे लागते. यादरम्यान या बिचाऱ्या मुलींना आंबट शौकिनांच्या अश्लील प्रश्नांना तोंड द्यावे लागते. सदर वेश्यांमुळे खडेबाजार येथील व्यापार -उद्योगावर मोठा विपरीत परिणाम होत असून या बाजारपेठेचे नांव देखील बदनाम होऊ लागले आहे.
आधीच कोरोना प्रादुर्भाव, लॉकडाउन, नाईट कर्फ्यू, विकेंड कर्फ्यू आदींमुळे बाजारपेठेमध्ये मंदी सुरू असताना यात भर म्हणून वेश्यांचा हा हैदोस सुरू झाल्यामुळे येथील व्यापारी दुकानदार अत्यंत त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात स्थानिक व्यापाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असली तरी अद्यापही कोणतीच कारवाई झालेली नाही.
खडेबाजार येथील हा वेश्याव्यवसाय म्हणजे बेळगाव स्मार्ट सिटीच्या प्रवेशद्वाराला लागलेला कलंक आहे. तेंव्हा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित सर्व वेश्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा. त्यांना खडेबाजार येथून हटवून त्यांच्या व्यवसायासाठी स्वतंत्र वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी. खडेबाजार येथील वेश्याव्यवसाय तात्काळ बंद न झाल्यास या भागातील नागरिकांसह समस्त दुकानदार व व्यापाऱ्यांना तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा खडेबाजार मर्चंट असोसिएशनने दिला आहे.