कर्नाटक राज्य सरकारच्या सूचनेनंतर कर्नाटक विद्यापीठ धारवाडने आपल्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना पदवीधर कन्नड सक्ती करू नये असा आदेश बजावला आहे.
धारवाड विद्यापीठाने कन्नड सक्ती मागे घेतली असली तरी राणी चन्नम्मा विद्यापीठाने (आरसीयू) अद्यापही असा कोणताही आदेश काढला नसल्यामुळे प्राध्यापकांसह विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात पदवी अभ्यासक्रमात कन्नड विषय सक्तीचा करण्यात आला होता. याविरोधात काहींनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे कन्नड सक्ती करू नये असा आदेश न्यायालयाने बजावल्याने त्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. यासंबंधी पाच दिवसांपूर्वी राज्य सरकारने एक आदेश काढत पदवी अभ्यासक्रमात कन्नड सक्ती करू नये, अशा सूचना शिक्षण विभागाला केल्या आहेत.
या आदेशानुसार धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाने एक आदेश काढून इच्छा असल्यास विद्यार्थी कन्नड विषयाची निवड करू शकतात असे म्हंटले आहे. तसेच कन्नड सक्ती मागे घेतल्याचे ही नमूद केले आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. हनुमंतप्पा के. टी. यांनी हा आदेश संबंधित महाविद्यालयांना बजावला आहे.
दरम्यान राणी चन्नम्मा विद्यापीठाने आपल्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना अद्याप कोणत्याही सूचना केल्या नसल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत 200 हून अधिक महाविद्यालयं येतात. तसेच या ठिकाणी पदवीचे शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र, गोवासह अन्य राज्यातील विद्यार्थी येत असतात. या विद्यार्थ्यांना सक्तीचा कन्नड विषय शिकवताना अडचणी येत आहेत. त्यामुळे आरसीयू विद्यापीठानेही सक्ती हटवावी, अशी मागणी केली जात आहे. कर्नाटक शासनाने आदेश दिल्यानंतरही राणी चन्नम्मा विद्यापीठाने कन्नड विषयाची सक्ती मागे घेतलेली नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे पुढील महिन्यात पदवीच्या परीक्षा होण्याची शक्यता असल्यामुळे विद्यापीठाने आत्ताच कन्नड सक्तीचा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.