येत्या फेब्रुवारी महिन्यात भारत आणि जपान लष्करा दरम्यान बेळगावात ‘धर्म गार्डियन’ या नांवाने होणाऱ्या संयुक्त लष्करी कवायतीच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला भेट देऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला.
संयुक्त लष्करी कवायतीसाठी आवश्यक सर्व व्यवस्था असतानाही गेल्या चार वर्षात बेळगावमध्ये अन्य देशांसोबत भारतीय लष्कराची संयुक्त लष्करी कवायत झालेली नाही. यंदा लष्कराने फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या भारत-जपान लष्करी कवायतीसाठी बेळगावची निवड केली आहे. त्यासाठी लेफ्टनंट जनरल नैन यांनी काल सोमवारी बेळगावला भेट दिली. मराठा सेंटरचे कमांडंट रोहित चौधरी आणि ज्युनियर लीडर्स विंगच्या कमांडरनी त्यांचे स्वागत केले.
लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी यावेळी दोन्ही केंद्रांना भेट देऊन कवायतीसाठी आवश्यक तयारीची पाहणी केली. या कवायतीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जानुसार आवश्यक असलेली सराव भूमी तयार करणारे लष्करी जवान आणि अधिकाऱ्यांचा त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जपानच्या लष्करी पथकाने गतवर्षी नोव्हेंबरमध्ये बेळगावला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला होता.
जागतिक पातळीवरील दहशतवादाच्या विरोधात सर्व देश संयुक्त लष्करी कवायतीचे आयोजन करून भविष्यातील जागतीक एकत्रित कारवाईची तयारी करत आहेत. त्यात भारतीय सेना आघाडीवर असून मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या सर्व देशांसोबत भारत संयुक्त लष्करी कवायत करत आहे.
बेळगावात आत्तापर्यंत अमेरिका, चीन, मालदीव, मंगोलिया, ब्रिटन व रशिया यांच्या लष्करांसमवेत संयुक्त सराव झाले आहेत. आता जपान सोबत भारतीय लष्कर बेळगाव सराव करणार असून त्याला ‘धर्म गार्डियन’ असे नांव देण्यात आले आहे. ही संयुक्त लष्करी कवायत येत्या 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.