बेळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना स्वतंत्र ओळखपत्र मिळणार असून सदर ओळखपत्र वाटपाचा शुभारंभ नुकताच जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते करण्यात आला.
समाजातील तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र ओळखपत्र देण्यात यावे अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून करण्यात येत होती. तथापि या ना त्या कारणास्तव त्याला मंजुरी मिळत नव्हती. अखेर गेल्या 2019 मध्ये केंद्र सरकारने तृतीयपंथीयांसाठी ओळखपत्र देण्याची योजना घोषित करून कार्यवाहीला सुरुवात केली.
बेळगाव जिल्ह्यातही आता त्याची सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते गेल्या गुरुवारी प्रातिनिधीक स्वरूपात सहाजणांना ओळखपत्र वितरण करण्यात आले. महिला व बालकल्याण खात्यातर्फे प्रत्येक जिल्ह्यात तृतीयपंथीयांना ओळखपत्र दिले जात आहे.
बेळगाव जिल्ह्यात 1,700 तृतीयपंथीय असून त्यांना टप्प्याटप्प्याने ओळखपत्र दिली जाणार आहे. जिल्ह्यातील लाभार्थींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त पोलीस खात्यात तृतीयपंथीयांसाठी 1 टक्का जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
नॅशनल पोर्टल व सामाजिक न्याय विभाग तृतीयपंथीयांना ओळखपत्र देत आहे. सरकारी नोकरीत आरक्षण, तसेच इतर कामांसाठी हे ओळखपत्र सहाय्यभूत ठरणार आहे. लाभार्थींनी अर्ज केल्यानंतर 30 दिवसात ओळखपत्र मिळणार आहे.