येत्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील अन्य जिल्ह्यांसह बेळगाव जिल्ह्यातही जवळपास विविध सरकारी सेवा एकाच छताखाली उपलब्ध असलेल्या ‘ग्राम -वन’ योजनेची सेवा प्रारंभ करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेची चांगली सोय होणार आहे.
कर्नाटक -वन, बेंगलोर -वनप्रमाणेच ही ग्राम -वन योजना लागू करण्यात येणार असून यामध्ये महसूल, अन्न व नागरी पुरवठा, आरोग्य, कामगार, वीज, पाणी आदी विविध खात्यांच्या 100 सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. येत्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी या योजनेचा शुभारंभ होणार आहे. सरकारच्या प्रमुख खात्यांच्या सेवा ग्रामीण भागातील जनतेला सुलभरीत्या मिळाव्यात यासाठी ग्राम योजना सुरू केली जाणार आहे.
योजनेच्या पहिल्या टप्प्यात बेळगावसह राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये ग्राम -वन सेवा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या ठिकाणी विविध प्रकारच्या 100 सेवा उपलब्ध होणारा आहेत. यामुळे सदर केंद्रे सुरू झाल्यास सरकारच्या विविध योजना आणि कामांसाठी नागरिकांची जिल्हा केंद्र तालुका आणि विभाग केंद्रातील कार्यालयात जाण्याची पायपीट वाचणार आहे.
ग्राम -वन केंद्रातील सेवा आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार असल्यामुळे कामे पूर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
यासाठी आवश्यक माहितीसह नागरिकांकडून समस्यांसंदर्भात आणि मागण्यांचे निवेदनही स्विकारण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आपल्या गावातील समस्या सरकार दरबारी मांडण्यास चांगली सोय होणार आहे.