आपल्या जवळील गोवा राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची चर्चा अर्थात निवडणुकीचे वारे बेळगाव आणि सीमाभागात येऊन पोहोचायला वेळ लागत नाही. महाराष्ट्र,कर्नाटक आणि देशात ही निवडणूक चर्चेची ठरली आहे ती भाजपने निष्ठावंतांना दिलेल्या आगळीकी मुळे. ज्यांनी भाजप गोव्यात घडवला आणि वाढवला त्या मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना भाजपने तिकीट न देणे.
लक्ष्मीकांत पार्सेकर सारख्यांना डावलणे आणि शेवटी या सगळ्यांना भाजप विरुद्ध बंड करायला लागणे ही गोमंतकीय जनता विरुद्ध भाजप अशी नांदी ठरत आहे.मराठी,कोकणी,ख्रिश्चन आणि मुस्लिम भाषिकांनी सामावलेल्या गोव्यात यावेळी भाजपला खिंडार पडणार हे नक्की आहे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस झीरो तर शिवसेनेचे संजय राऊत हिरो अशी चर्चा निवडणुकीपूर्वीच सुरू झाली आहे.
पणजी हा मतदारसंघ म्हणजे दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा बालेकिल्ला. या ठिकाणी त्यांचे पुत्र उत्पल यांना उमेदवारी द्यावी ही साऱ्या जनतेची मागणी. मात्र सद्या गोवा भाजपचे नेतृत्व करणारे तथाकथित आणि सद्या गोव्याचे प्रदेशाध्यक्ष असणारे पुन्हा येईन नेते देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.अखेर जनतेच्या आदेशाने पणजितून अपक्ष उमेदवार म्हणून लढण्यास उत्पल पर्रीकर पुढे सरसावले. नेमके इथेच देवेंद्र फडणवीस सामान्य गोमंतकीय जनतेत झीरो ठरले. स्वच्छ चेहऱ्याच्या आणि भाजपला राज्यात उभे केलेल्या पर्रीकर च्या मुलाची अवस्था भाजप अशी करीत असेल तर सामान्य जनतेला काय किंमत देईल अशी भावना गोव्यात तयार झाली आहे.
समितीचा उमेदवार असताना भाजप उमेदवाराच्या प्रचाराला येऊन देवेंद्र फडणवीस यांनी जशी सीमाभागात आपली घालवून घेतली तशीच त्यांची गोव्यातही गेली आहे. यामुळे 100 किलो मिटर वरून भाजपच्या अधोगतीची झालेली सुरुवात आणि त्याची धग बेळगावात नक्कीच जाणवत आहे.
आता याच उत्पल पर्रीकर यांना भाजपने डावलले तरी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्वपक्षीय पाठिंबा मिळवून देण्यासाठी बाहू सरसावलेल्या खासदार संजय राऊत यांची किंमत नक्कीच वाढली आहे. अपक्ष म्हणून भरलेला अर्ज उत्पल यांनी शेवटपर्यंत कायम ठेवल्यास रिंगणातून शिवसेनेचा उमेदवार माघार घेईलच शिवाय काँग्रेस आणि आप ला ही तशी विनंती करू असे जाहीर करून संजय राऊत यांनी भाजप च्या हेकेखोर आणि एकाधिकारशाहीला विरोध केला आहे. भाजप वर नाराज झालेली जनता यामुळे नक्कीच संजय राऊत यांचे गुणगान गात असून राऊत गोमंतकीय जनतेत हिरो ठरत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी जे करायला हवे ते केले नाही. बाबुष मोंसेरात सारख्या उमेदवारासाठी साऱ्या जनतेचा रोष ओढवून घेतला आणि यात भाजप नक्कीच गोव्यात रसातळाला जाईल असे गोमंतकीय नागरिक उघडपणे बोलून दाखवीत आहे. घोडा मैदान दूर नाही. येत्या पंधरा दिवसात निवडणूक होतेय,यामुळे लवकरच काय खरे आणि काय खोटे ते स्पष्ट होईलच.