टिळकवाडी पहिले रेल्वे गेट येथील रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे उद्या हे रेल्वे गेट रहदारीसाठी खुले करण्याबरोबरच या ठिकाणी घालण्यात आलेल्या कॉंक्रीटचे नुकसान होऊ नये यासाठी त्याला संरक्षण देण्याची सूचना करण्यात येत आहे.
विकेंड कर्फ्यूचा लाभ उठवताना टिळकवाडी पहिला रेल्वे गेट येथील रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन पूर्ण करण्यात येत आहे. या ठिकाणचा संपूर्ण रस्ता खास मशीनद्वारे पेव्हर्स घालून बनविण्यात आला आहे.
तसेच पेव्हर्सचा रस्ता मजबूत राहावा यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला काँक्रेट घालण्यात आले आहे. वीकेंड कर्फ्यू आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज दिवसभर सदर रस्त्याचे काम वेगाने सुरू होते.
हे काम आज दिवस अखेर पूर्ण होणार असल्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उद्या सकाळी पहिले रेल्वे गेट रहदारीसाठी खुले करावे, अशी मागणी सोशल मीडियावर ट्विटरच्या माध्यमातून केली जात आहे.
रेल्वे गेट खुले करण्याबरोबरच रस्त्याच्या दोन्ही बाजूला घालण्यात आलेले कॉंक्रीट उद्यापर्यंत ताजे राहण्याची शक्यता आहे. परिणामी ये -जा करणारी वाहने आणि पादचाऱ्यांमुळे काँक्रीट खराब होऊ नये यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावण्याची अथवा ओळीने दगडविटा ठेवून काँक्रीट सुरक्षित करण्याची सूचना कंत्राटदार अथवा गेटमनला केली जावी, असा सल्लाही कांही जागरूक नागरिकांनी दिला आहे. त्याचप्रमाणे रस्ता व्यवस्थित दुरुस्त झाल्याबद्दल समाधानही व्यक्त केले आहे.