बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलने दिवंगत सिंधुताई सकपाळ यांच्या सन्मती बाल निकेतन, मांजरी पुणे या अनाथ आश्रमाला जीवनावश्यक साहित्याची मदत करून माईंच्या कार्याला छोटासा हातभार लावत त्यांना आदरांजली वाहिली.
अनाथांची ‘माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ या नुकताच कालवश झाल्या. त्यांचे समाजकार्य सर्वांनाच प्रेरित करणारे होते. त्यांचाच आदर्श घेऊन अनेक सामाजिक संस्था समाजामध्ये गरीब गरजू निराधार लोकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करीत असतात.
बेळगाव येथील फेसबुक फ्रेंड्स सर्कल ही त्यापैकीच एक संघटना आहे. फेसबुक फ्रेंड्स सर्कल अन्नदान, वस्त्रदान, रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, पर्यावरण संरक्षण, प्राणी -पक्षी संरक्षण यासारख्या अनेक सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत असते. समाजातील गरजू लोकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करीत असते.
दिवंगत सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली म्हणून नुकताच फेसबुक फ्रेंड्स सर्कलने माईंच्या सन्मती बाल निकेतन, मांजरी बुद्रुक -पुणे येथील अनाथ आश्रमाला तांदूळ, गहू, डाळ, साखर, पोहे आदी जीवनावश्यक साहित्य देऊन माईंच्या कार्याला छोटासा हातभार लावण्याद्वारे माईंना आदरांजली वाहिली.
याप्रसंगी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते राजू करजखेडे, संजय जगताप, राजेश मांढरे, राहुल जाधव यांनी आश्रमात जाऊन आश्रमांच्या संचालिका विद्या यांच्याकडे अन्नधान्य सुपूर्द केले. मदतीबद्दल आभार मानून विद्या यांनी सन्मती बाल निकेतनशी असलेला फेसबुक फ्रेंड्स सर्कलचा हा स्नेह असाच कायम रहावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
या मदतीसाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, डॉ. समीर शेख, डॉ.आनंद तोटगी, डॉ.देवदत्त देसाई, कॅन्टोनमेंट प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे, प्रा.भरमा कोलेकर यांचे सहकार्य लाभले.