बेळगाव शहरातील दोन्ही होलसेल भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, या मागणीसाठी नेगीलयोगी रयत संघातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बुधवारी सकाळी नेगीलयोगी रयत संघातर्फे संघटनेचे राज्याध्यक्ष रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रवी पाटील यांनी बेळगावच्या एपीएमसी भाजी मार्केटमध्ये व्यापारी कमी आहेत. या ठिकाणच्या दुकान गाड्यांचा वापर फक्त भाड्या पुरता मर्यादित आहे. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळत नाही आणि त्यांच्यावर अन्याय होतो. तेंव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून एपीएमसी मार्केट यार्ड येथे शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करावा अशी आमची मागणी आहे, असे सांगितले.
नेगीलयोगी रयत संघाचे जिल्हाध्यक्ष बसवराज मोकाशी यांनी यावेळी बोलताना बेळगावात खासगी एपीएमसी मार्केट सुरू झाले आहे. या ठिकाणी दुकाने देखील जास्त असल्यामुळे स्पर्धा वाढवून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. एकंदर दोन्ही बाजूचे मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना चांगला दर मिळावा अशी आमची मागणी आहे असे स्पष्ट केले. याप्रसंगी सदर रयत संघाचे जिल्हा संचालक सुरेश वाली यांच्यासह अन्य सदस्य व शेतकरी उपस्थित होते.