महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेते विचारवंत पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीचे अग्रगण्य नेते तसेच बेळगाव, कारवार, बिदर भागाच्या सीमा प्रदेशातील मराठी जनतेचे नेते प्रा. डॉ. एन डी. पाटील यांचे आज देहावसान झाले. अन् एकाच वेळी राजकारण समाजकारण अर्थकारण प्रबोधन अंधश्रद्धानिर्मूलन शेतकऱ्यांचे प्रश्न आणि या साऱ्या बरोबरच सीमा प्रश्नाची बांधिलकी ठेवून तेथील प्रत्येक चळवळीत सक्रिय असणारे थोडक्यात महाराष्ट्र -कर्नाटकचा सीमाप्रश्न या दोन्ही लढ्यातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले.
महाराष्ट्रामध्ये शिक्षण जागतिकीकरण शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न सामाजिक सुधारणांच्या चळवळी अंधश्रद्धानिर्मूलन इत्यादींच्या संबंधी ज्या ज्या चळवळी झाल्या त्या चळवळींशी एन. डी. साहेबांचा सहभाग होता. तथापि सीमा प्रश्न आणि सीमाभागातील मराठी जनतेचे प्रश्न यासाठी सतत कार्य करणारा या प्रश्नाचा सखोल ज्ञान असणारा नेता म्हणून ते एकमेव होते.
1 नोव्हेंबर 1956 ला बेळगाव, बिदर, कारवार, गुलबर्गा जिल्ह्यातील मराठी जनतेला अन्यायाने कर्नाटका डांबण्यात आले. भाषावार प्रांतरचना होऊन सुद्धा मराठी जनतेवर जो अन्याय झाला त्याविरुद्ध महाराष्ट्रातील अनेक थोर मंडळींनी प्रयत्न केले. परंतु सुरुवातीपासून आजपर्यंत या आंदोलनात सक्रिय नेते किंबहुना या नेत्याच्या पिढीतील शेवटचे नांव म्हणजे भाई. एन. डी. यांचा गेल्या 6 दशकांहून अधिक काळ सीमा प्रश्नाशी या भागातील लहानथोर कार्यकर्त्यांशी संबंध होता. बेळगावातील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्य करीत असल्याने या संस्थेच्याही प्रत्येक घडामोडींशी ते संबंधित होते.
सीमा भागातील जनतेवरील अन्याय दूर करण्यासाठी येथील मराठी जनता महाराष्ट्राच्या सहकार्याच्या आशेवर गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या पद्धतीने लढे देत आहे. भाषावार प्रांतरचना होण्यापूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जे 105 हुतात्मे झाले. त्यापैकी 5 हुतात्मे या भागातील आहेत. त्यांना साक्षी ठेवून सुरुवातीस जे लढे हाती घेतले त्यामध्ये दिल्ली मोर्चा, सत्याग्रह, आंदोलन, बर्डोलीच्या धर्तीवर साराबंदी आंदोलन. या सर्व लढ्यांमध्ये त्या काळातील नेत्यांबरोबर तरुण वयात त्यांनी सहभाग घेतला साराबंदीच्या लढ्यात एस. एस. जोशी, भाई उद्धवराव पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी, भाई दाजिबा देसाई यांच्याबरोबर सीमा भागातील अनेक नेत्यांबरोबर त्यांनी सीमाभाग प्रचाराच्या दृष्टीने पायाखाली घातला. सीमा प्रश्नासाठी आपल्या जमिनी पणाला लावणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागे ते अभेद्य पणे उभे राहिले. पोलिसांच्या अन्वन्वित अत्याचाराला भिक न घालता सरकार आणि पोलिसांच्या नाकीनऊ आणण्याचे कार्य त्यावेळी त्यांनी केले. ज्या तत्त्वाच्या आधारे आंध्रप्रदेशात सीमा प्रश्न सोडविण्यात आला त्याच धर्तीवर खेडे घटक, भाषिक बहुसंख्य, भौगोलिक सलगता, लोकेच्छा या चतु:सुत्रीच्या आधारे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न करून सीमा प्रदेशाचा समावेश महाराष्ट्रात करण्यात यावा. येथील जनता जो प्रयत्न करीत आहे त्यामागे आज पर्यंत ठामपणे सीमावासियांना सोबत एन. डी. साहेब उभे होते.
या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी 1956 पासून अनेक वेळा केंद्र सरकारकडे महाराष्ट्राच्यावतीने अनेक शिष्टमंडळ नेमण्यात आली. गृहमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांना या प्रश्नाची निकड सांगण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री खासदार, आमदार, सीमा प्रदेशातील नेते भेटले त्या प्रत्येक शिष्टमंडळात एन. डी. साहेबांचा समावेश होता. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, राजीव गांधी, चंद्रशेखर, नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहनसिंह या सार्या पंतप्रधानांबरोबर चर्चेत भाग घेणारे ते आजच्या काळातील एकमेव नेते होते असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. सीमा प्रदेशातील प्रत्येक खेड्याची खडानखडा माहिती असल्यामुळे शिष्टमंडळाची बाजू मांडण्यासाठी चोख भूमिका त्यांनी बजावली होती.
- सीमा प्रदेशातील अनेक आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेऊन त्यांनी अनेक वेळा तुरुंगवासही भोगला होता. 1986 च्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात त्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक करून विजापूरच्या जेलमध्ये डांबले होते. केवळ भाषणबाजी करून नव्हे तर प्रत्यक्ष सहभागाने त्यांनी सीमा भागाशी बांधिलकी जपली होती. 17 जानेवारी आणि 1 जूनच्या हुतात्मा दिनी, 1 नोव्हेंबर काळा दिन या कार्यक्रमात त्यांचा आजपर्यंतचा सहभाग सीमावासियांना मोठे पाठबळ देणारा ठरला आहे. आम्ही असे अनेक नेते पाहिले आहेत की बेळगावात येऊन राणा भीमदेवी थाटात त्यांनी भाषणे केली. परंतु सीमा भागाची वेस ओलांडल्यावर ते प्रश्न आणि लोकांनाही विसरले. एन. डी. साहेबांचे वैशिष्ट्य हे की हुतात्मा दिनी आणि काळा दिनी ते स्वतःच्या मोटारीने बेळगावला यायचे. कार्यकर्ते, नेते यांच्याशी संवाद करायचे, भावी काळातील लढायची दिशा ठरवायची त्यादृष्टीने प्रयत्न करीत राहायचे. एन. डी. साहेबांच्या अशा प्रसंगातील सहभागामुळे कार्यकर्ते व नेते मंडळींमध्ये एक प्रकारचा उत्साह संचार असे.
सीमाभागातील गेल्या प्रत्येक निवडणुकीत येथे येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचाराचे रान त्यांनी उठवले होते. बेळगाव शहर असो की बेळगाव, खानापूर सीमाभागातील खेडी असो छोट्या-मोठ्या सभांचे आयोजन करून इथल्या जनतेला त्यांनी समर्थ साथ दिली होती. कांही वेळा समितीच्या पदरी अपयश आले. पण प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी आपली वाटचाल चालू ठेवली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे घेऊन समितीची पुनर्रचना करण्याचे कामही त्यांनी केले. जी मंडळी समिती विरोध राहिली, ज्यांनी समितीशी द्रोह केला. त्यांना कोणतेही पद न देता त्यांनी समितीचे काम करावे असे सुनावणार येथे एकमेव नेते होते. यामुळे अनेक जणांनी एन. डी. साहेबांशी असहकार्याची भूमिका घेतली. परंतु समितीच्या निष्ठेने समोर इतर सारे तुच्छ लेखून साहेबांनी आपली वाटचाल चालूच ठेवली होती आणि म्हणूनच या भागातील मराठी जनतेचे जे जे प्रश्न आहेत त्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून अनेक शिष्टमंडळे, मोर्चे, धरणे यांचे आयोजन करुन त्यांनी मराठी भाषिकांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, येथील पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य यांना बरोबर घेऊन अनेक अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे काम साहेबांनी केले होते.
कर्नाटक सरकारने बेळगाव येथे विधानसभेच्या इमारतीचे बांधकाम करून हिवाळी अधिवेशन घेण्याचा घाट ज्यावेळी घातला त्यावेळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारच्या विरुद्ध महामेळाव्याचे आयोजन करून सरकारला विरोध करण्याचे काम मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती करत आली आहे. एन. डी. साहेबांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचे आयोजन केले जात होते. या मेळाव्यास महाराष्ट्रातील नेते मंडळींना हजर ठेवण्याच्या कामी एन. डी. साहेबांचा सहभाग मोठा असायचा. हे मेळावे घेतले जाऊ नयेत यासाठी कर्नाटक सरकार अनेक प्रकारे सतावणूक करण्याचा प्रयत्न करत असे परंतु एन. डी. साहेब कर्नाटक सरकारच्या कारवायांना दाद देत नसत. मध्यंतरी कर्नाटक सरकारने समिती मेळाव्यांवर बंदी घातली. परंतु एन. डीं.नी आडमार्गाने मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून बंदीमुळे स्वतःला अटक करून घेतली. बेळगाव, खानापूर येथील मेळावे त्यावेळी यशस्वी झाले ते एन. डी. साहेबांमुळेच.
एन. डी. साहेबांचे सीमाभागासाठीचे योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या उच्च अधिकारी समितीचे अध्यक्षपद त्यांना दिले. 29 मार्च 2004 ला सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला यासाठी महाराष्ट्र सरकारने तज्ञ समिती महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण व देवेंद्र फडणवीस यांनी कार्य केले. पण तज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून एन. डी. साहेबांनी या कामाला न्याय देत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ॲड. हरीश साळवे, के. के. परासरण, राजू रामचंद्रन, विनोद बोबडे, अरविंद दातार व इतर वकिलांची नेमणूक करण्याचे अधिकार एन. डी. साहेबांना देण्यात आले होते. गेल्या 14 हून अनेक वर्षात तेच तज्ञ समितीच्या बैठकांचे आयोजन करत होते. अलीकडे प्रकृती अस्वस्थ असतानाही केवळ सीमा भागातील जनतेच्या बांधिलकी पोटी आणि सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठीच्या ध्यासापोटी ते कार्य करत होते. सीमा प्रश्नासाठी आपल्या आयुष्याचा क्षण अन क्षण पणास लावणाऱ्या एन. डी. पाटील यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो ही प्रार्थना!
– मालोजीराव अष्टेकर माजी महापौर, सरचिटणीस मध्यवर्ती म. ए. समिती