बेळगाव शहरातील एपीएमसी पोलीस ठाण्यातील 8 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यामुळे कोरोना विषाणूने आता बेळगाव पोलिसांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. यामुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे.
एपीएमसी पोलीस ठाण्यातील कोरोनाग्रस्त आठही पोलिसांवर होम आयसोलेशनद्वारे उपचार सुरू आहेत. रोगाची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नसल्यामुळे या सर्वांवर घरातच उपचार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील पोलिसांची कोरोना तपासणी केली जात आहे. त्याअनुषंगाने काल सोमवारी बेळगाव शहर पोलिसांची तपासणी करण्यात आली.
सेवा बजावणाऱ्या म्हणजे ड्युटीवर असलेल्या पोलिसांची नजीकच्या सरकारी आरोग्य केंद्रात आणि उर्वरित पोलिसांची पोलीस हेडकॉर्टर येथे काल आरटी -पीसीआर चांचणी करण्यात आली.
या चांचणीमध्ये एपीएमसी पोलीस ठाण्यातील 8 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पोलीस स्थानकात कोरोनाचा शिरकावा झाल्यामुळे एपीएमसी पोलीस ठाण्याची इमारत आणि आवाराचे आज संपूर्ण सॅनिटायझेशन करण्यात आले आहे.