सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या एज्युकेशन फाॅर नीडी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बुक बँकेच्या प्रकल्पांतर्गत केएलई नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्यांच्या सहकार्याने एका विद्यार्थ्याला सुमारे 10 हजार रुपये किंमतीची पुस्तके युद्धपातळीवर उपलब्ध करून मदत करण्यात आली.
सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या एज्युकेशन फाॅर नीडी अंतर्गत राशी अनगोळकर यांच्या नेतृत्वाखाली शालेय व महाविद्यालयीन मुला मुलींसाठी ‘बुक बँक’ हा प्रकल्प मागील वर्षापासून राबविला जात आहे.
बुक बँकेच्या या प्रकल्पाअंतर्गत उत्तीर्ण झालेल्या शाळा -कॉलेजीस मधील विद्यार्थ्यांची मागील वर्षातील पाठ्यपुस्तके गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वापरण्यास दिली जातात. मात्र आज सकाळी डॉ. रवी पाटील हेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या अभिषेक हादीमनी या विद्यार्थ्याने बुक बँक चालविणार्या सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनकडे नर्सिंग अभ्यासक्रमाच्या कांही पुस्तकांबाबत विचारणा केली.
तेंव्हा आपल्या बुक बँकेत संबंधित पुस्तके नाहीत हे फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच केएलई नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती सुधा रेड्डी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी प्राचार्या रेड्डी यांनी तात्काळ सहकार्य करताना अभिषेक हादिमनी या विद्यार्थ्यांला आवश्यक असलेली नर्सिंगची पुस्तके बुक बँकेला उपलब्ध करून दिली.
प्राचार्य रेड्डी आणि सुरेंद्र अनगोळकर यांच्या हस्ते सदर सुमारे 10 हजार रुपये किंमतीची पुस्तके अभिषेक यांच्याकडे अभ्यासासाठी सुपूर्द करण्यात आली. आपल्या बुक बँकेला नर्सिंगची पुस्तके देणगीदाखल देऊन केलेल्या सहकार्याबद्दल अनगोळकर यांनी प्राचार्या सुधा रेड्डी यांचे आभार मानले. तसेच यंदाच्या वार्षिक परीक्षा जवळ आल्या आहेत.
तेंव्हा या परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या जुन्या झालेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके वाया न घालवता ती इतर गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांच्या कामी यावीत यासाठी एज्युकेशन फाॅर नीडीच्या बुक बँकेकडे सुपूर्द करून सहकार्य करावे, असे आवाहन सुरेंद्र अनगोळकर यांनी केले आहे.