बेळगाव महानगरपालिकेच्या यंदाच्या 2021 -22 सालच्या बजेट अर्थात अंदाजपत्रकासंदर्भात पूर्वतयारीची बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीचे औचित्य साधून सिटिझन्स कौन्सिल बेळगावतर्फे शहराच्या हितार्थ कांही सल्ला -सूचनांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
सिटिझन्स कौन्सिल बेळगावच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली सादर केलेले निवेदन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्वीकारून सुचविलेल्या सल्ला सूचनांची निश्चितपणे दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले. आपल्या भागातील व्यापार, वाणिज्य आणि उद्योग क्षेत्राला प्रकाशात आणून प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नगरपालिका ‘प्रमोशन इव्हेंट’ आयोजित करत आहेत.
त्याप्रमाणे बेळगाव महापालिकेने देखील येथील व्यापार, वाणिज्य आणि उद्योग क्षेत्राला प्रोत्साहित करण्यासाठी प्रमोशन इव्हेंटचे आयोजन करावे. ऑनलाइन ट्रेड लायसन्ससंदर्भात व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती केली जावी. शहरवासीयांच्या समस्या निकालात काढण्यासाठी हेल्पलाइन नंबर सुरू करावा. शहरातील बऱ्याच भागात सार्वजनिक मुताऱ्या नाहीत. विशेषत: महिलांसाठी एकही नाही. त्यामुळे शहराला भेट देणाऱ्या महिलावर्गाची मोठी गैरसोय होत असते. तेंव्हा ही समस्या तात्काळ निकालात काढली जावी. अलीकडेच कांही एनजीओंनी काकतीवेस येथे एक पिंक प्रोजेक्ट सुरू केला आहे.
त्याच धर्तीवर महापालिकेने शहरात विविध ठिकाणी विशेष करून बाजारपेठेत महिला स्वच्छतागृह उभारावीत. शहरातील बाजारपेठेचा विस्तार वाढत आहे. यासाठी बाजारपेठेच्या भागांमध्ये शटल मिनीबस सेवा सुरू करावी. शहरातील गजबजलेल्या भागात प्रीपेड ऑटोरिक्षा बुथ सुरू करावेत. विशेष करून चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, रेल्वेस्टेशन, गोवावेस, नाथ पै सर्कल शहापूर, वडगाव या ठिकाणी हे बुथ सुरू केले जावेत. शहरात ठिकठिकाणी विशेष करून गर्दीच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्हेंडींग मशीन बसविली जावीत.
पार्किंगची समस्या लक्षात घेता शहरात युद्धपातळीवर किमान चार बहुमजली पार्किंग संकुल उभारण्यात यावीत. कोरोनाच्या संकटामुळे समाजाच्या सर्व क्षेत्रात आर्थिक मंदी असल्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात पालिकेच्या करांमध्ये वाढ केली जाऊ नये. शहरात जेष्ठ नागरिक आणि महिलांसाठी जसे प्रशस्त वाॅकर्स झोन सुरू करण्यात आले आहेत. तसेच झोन महापालिकेच्या विस्तारित भागातही सुरू केले जावेत. शहरातील व्यापारी उद्योजकांच्या व्यवसायिक जागा आणि संवेदनशील नागरी वसाहतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जावेत. शहरात हरित शहर प्रकल्प राबविला जावा. यासाठी अनावश्यक वृक्षतोड थांबवावी.
जुन्या मोठ्या वृक्षांचे टॅग लावून त्यांचे संरक्षण व संवर्धन केले जावे. गेल्या कांही वर्षातील वृक्षतोडीमुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा तसेच औद्योगिक परिसर व अन्य क्षेत्राच्या ठिकाणी वृक्ष लागवड केली जावी. महापालिकेच्या प्रत्येक प्रभागांमध्ये नागरिकांसाठी तक्रार निवारण केंद्र स्थापण्यात यावे, अशा सल्ला व सूचना सिटिझन्स कौन्सिलने आपल्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. निवेदन सादर करतेवेळी सतीश तेंडुलकर, शेवंतीलाल शहा, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.