बेळवट्टी (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षपदी म. ए. समितीचे उमेदवार म्हाळू नारायण मजूकर यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी अपक्ष उमेदवार महादेवी परशराम मेदार या बिनविरोध निवडून आल्या. यामुळे बेळवट्टी ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकला आहे.
बेळवट्टी ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज सोमवारी सकाळी सुरळीत पार पडले. या ग्रामपंचायती अंतर्गत बेळवट्टीसह बाकनूर, बडस व धामणे अशी चार गावं येतात. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 11 आहे. आज ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरस होती. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या म्हाळू नारायण मजूकर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर 6 विरुद्ध 5 अशा मतांनी विजय मिळविला.
समितीचे ग्रा. पं. सदस्य विठ्ठल रामचंद्र पाटील, अनुराधा कृष्णा कांबळे, रेश्मा निंगो कुलम, रेणुका प्रकाश सुतार व रूपा रवळनाथ सुतार यांनी आपल्या मतांचा कौल म्हाळू मजूकर यांच्या बाजूनी देऊन त्यांना विजयी केले.
ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्ष पदासाठी बेळवट्टीच्या महादेवी परशराम मेदार या एकमेव उमेदवार असल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. नूतन ग्रा. पं. अध्यक्ष म्हाळू नारायण मजूकर हे बोकनूर गावचे ग्रा.पं. सदस्य आहेत. त्यांची निवड घोषित होताच समितीच्या उपस्थित ग्रामपंचायत सदस्य आणि समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करून नूतन अध्यक्ष यांचे अभिनंदन केले.
त्याचप्रमाणे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस एम. जी. पाटील, बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर, तालुका युवा समितीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, माजी एपीएमसी अध्यक्ष आप्पा जाधव, पुंडलिक पावशे, एम. डी. मोहनगेकर आदींनी नूतन ग्रा. पं. अध्यक्ष म्हाळू नारायण मजूकर यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्याबरोबरच अध्यक्षपदाच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.