कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या विकेंड कर्फ्यू कालावधीत मद्य विक्रीवर पूर्णपणे बंदी असणार आहे. वीकेंड कर्फ्यू कालावधीत बार, पब, एमआरपी दारू दुकाने सुरू ठेवू नयेत. यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित विभागातील पोलीस उपनिरीक्षकांनी सांभाळावी.
आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी, अशी सूचना पोलिसांना देण्यात आली आहे. आज शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून येत्या सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत मद्यविक्री बंद करावी असा आदेश जारी राहणार आहे.उर्वरित दिवशी बार, पबमध्ये आसन क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच प्रवेश देऊन मद्य विक्री करावी. मद्य विक्री करताना फेस मास्कसह सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन केले
जावे, असेही या आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने वीकेंड कर्फ्यू कालावधीत मद्य पार्सल नेण्याची मुभा दिलेली नाही.
कायदा सल्लागारांना कर्फ्यूमध्ये सूट!
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला असला तरी आठवडा अखेर कायद्या संबंधित संस्था किंवा वकिलांची कार्यालयं पूर्ण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने कार्यरत ठेवण्यास राज्य सरकारने अनुमती दिली आहे.
कोरोना आणि ओमिक्रॉन व्हेरीएंटच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध कडक करण्यात येत आहेत. तथापि राज्यातील वकील आणि कायदेशीर सल्लागारांना यात सूट देण्यात आली आहे. कायदेशीर सल्ला अथवा कायदा कंपन्या -कार्यालयं 50 टक्के कर्मचारी क्षमतेसह आठवडाअखेर सुरू ठेवता येतील. मात्र त्यांनी कोरोना मार्गदर्शक सुचीचे काटेकोर पालन करणे अनिवार्य असणार आहे. वकील, कायदेशीर सल्लागार अथवा संबंधित कर्मचाऱ्यांकडे त्यांचे अधिकृत ओळखपत्र असणे गरजेचे असेल. दरम्यान वीकेंड कर्फ्यूचा कालावधी आज शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून येत्या सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत असणार आहे.