महानगरपालिकेची निवडणूक होऊन चार महिने उलटले, मात्र अद्याप महापौर उपमहापौर पदाची निवड झालेली नाही. त्यामुळे नाराजीचा सूर उमटला आहे. मात्र या परिस्थितीला आता नव्याने यू-टर्न मिळाला आहे .
महापौर आणि उपमहापौर पदासाठी महिला सदस्यांची निवड करण्याचे आरक्षण जाहीर झाले आहे.आता दोन्ही पदे महिला सदस्यांच्या हाती जाणार असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या पुरुष सदस्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
महापौर आणि उपमहापौर या पदांवर आता महिला सदस्यांचा हक्क राहणार असल्याची नवीन घोषणा करण्यात आली आहे . यापूर्वी महापौरपदासाठी सामान्य गटातील पुरुष आणि उपमहापौर पदासाठी सामान्य गटातील महिला उमेदवाराची नियुक्ती करण्यासाठी आरक्षण जाहीर झाले होते .
एक वर्षभरापूर्वी हे आरक्षण जाहीर झाले होते, आता नव्या वर्षा मुळे नवे आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे महापौर पदासाठी सामान्य गट महिला आणि उपमहापौर पदासाठी मागास ब गटातील महिला सदस्याची निवड केली जाणार आहे. लवकरच या निवडणुकीसाठी तारखेची घोषणा होणार आहे.
मागील वर्षात निवडणूक झाली असती तर सामान्य गटातील पुरुष नगरसेवकाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडू शकली असती,मात्र निवडणूक झाल्यानंतर मोठा काळ वाया गेला आहे. आता नव्या आरक्षणानुसार ही निवडणूक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. सद्या याची जोरात चर्चा सुरू आहे.