एकीकडे कोरोना रुग्ण वाढ मोठ्या प्रमाणात होत असताना दुसरीकडे त्या संदर्भातील नियमांचे पालन करण्याच्या बाबतीत दुर्लक्ष केले जात आहे. यासंदर्भात बेळगाव महानगरपालिकेने ठीक ठिकाणी जागृती मोहीम चालू करून मास्क वापरण्यासाठी जनजागृतीचा मार्ग अवलंबला आहे.
सध्या प्रामाणिकपणे सूचना दिल्या जात असून यापुढील काळात मास्क वापरा अन्यथा कठोरातील कठोर कारवाई केली जाईल. असा इशाराही बेळगाव महानगरपालिकेने दिला आहे.
दुसरी लाट येऊन गेल्यानंतर काही प्रमाणात मास्क वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नागरिक मास्क न वापरताच इतरत्र वावरू लागले आहेत. त्यामुळे धोका होऊ शकतो या संदर्भात बेळगाव महानगरपालिकेचा आरोग्य विभाग पुन्हा एकदा जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरला आहे.
कर्नाटकात पुन्हा एकदा कोरोना आणि ओमीक्रॉनचा विस्फोट झाल्याने राज्य सरकारने अनेक कडक उपाययोजना केल्या आहेत. तर बेळगाव पालिकेतर्फे पुन्हा एकदा मास्कचा वापर, सामाजिक अंतर आदींसाठी जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, सामाजिक अंतर पाळणे याबाबत पालिका कर्मचारी जागृती करत आहेत. बुधवारी बेळगाव एपीएमसीत मास्क न घातलेल्या महिलांना त्यांनी मास्कचे वाटप केले.
पालिका कर्मचाऱ्यांना पाहून एका व्यक्तीने तेथे पडलेला प्लास्टिकचा कागद तोंडावर मास्कसारखा लावला. ते पाहून कर्मचाऱ्यांनी त्याला खरेदी करून मास्क वापरण्याची सूचना केली. पालिका कर्मचाऱ्यांनी यावेळी एपीएमसीत येणाऱ्या-जाणाऱ्यांना कोरोनाचा आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाबाबत माहिती देऊन जागृकता निर्माण केली.