बेळगावच्या स्थानिक लहान व्यापारी आणि लघु उद्योजकांनी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करावी, या हेतुने बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची योजना आखली जात आहे.
रिलायन्स, मोर, बिग बजार या सारख्या कंपन्यांनी लहान -मोठ्या शहरातील बाजारपेठा काबीज करण्यास सुरुवात केल्यामुळे अनेक स्थानिक व्यापारी आणि व्यवसायिकांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. संबंधित कंपन्यांच्या दराशी स्पर्धा करू शकत नसल्यामुळे स्थानिक मंडळी पिछाडीवर पडत आहेत. संबंधित कंपन्यांकडून साहित्य -उत्पादनांची एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असल्यामुळे किराणामाल, भाजीपाला, स्टेशनरी आदींसह इतर गोष्टींची त्यांच्याकडून कमी दराने विक्री केली जाते. याचा स्थानिक व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिकांना फटका बसत आहे. यासाठी बेळगावातील व्यवसायाला नवी चालना देण्याच्या उद्देशाने बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज एका फर्मची स्थापना करण्याची योजना आखत आहे. जेणेकरून त्या फर्मच्या माध्यमातून स्थानिक व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकतील. सदर योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी शहर परिसरातील व्यापारी आणि लघु उद्योग चालकांनी गटागटाने पुढे यावे असे आवाहन बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रोहन जुवळी यांनी केले आहे.
व्यापाऱ्यांनी आपापले गट बनवून चेंबरकडे जावे. ज्यामुळे संक्रमण अर्थात मालवाहतूक करणे सोयीचे जाणार आहे. त्याचप्रमाणे चेंबर मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी उत्तम स्त्रोत शोधेल किंवा व्यापाऱ्यांनी त्यांना माहिती असलेल्या चांगला स्त्रोत सुचवावा. खरेदी करत असलेल्या मालाचा जो अंतिम दर असेल तो संबंधित व्यापाऱ्यांनी फर्मच्या खात्यावर हस्तांतरित करावा. ते पैसे विक्रेत्याला अदा केले जातील. या व्यापारासाठी चेंबर ऑफ कॉमर्स कोणतेही कमिशन घेणार नाही. मधल्यामध्ये नफ्याचा मोठा हिस्सा हडपणाऱ्या बाजारपेठेतील मध्यस्थांना बाजूला काढणे हा या मागचा मूळ उद्देश आहे.
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज भाजीपाला, स्टेशनरी, प्लास्टिक साहित्य, किराणामाल, स्वच्छतेची साधने -वस्तू, इलेक्ट्रॉनिक साहित्य आदींच्या खरेदीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देईल. यासंदर्भात व्यापारी समितीच्या बैठकीत चर्चाही झाली असून ही योजना मूर्त स्वरूप येत आहे असे सांगून सदर योजना प्रत्यक्षात उतरण्यासाठी व्यापाऱ्यांनी अधिक रस दाखविणे आवश्यक आहे असे मत जवळी यांनी व्यक्त केले.
मोठ्या कंपन्या बाजारपेठेत उतरत असल्यामुळे स्थानिक लोकांना फटका बसत आहे. या कंपन्यांकडे सर्व प्रकारचे स्त्रोत असल्यामुळे ते होलसेल व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतात. ज्यामुळे त्यांना तो माल कमी दरात विकता येतो. तथापि स्थानिक विक्रेते -दुकानदार दराच्या बाबतीत मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत.
तेंव्हा जर विविध क्षेत्रातील व्यापारी -दुकानदारांनी संघटित होऊन आम्ही सुचविलेली योजना प्रत्यक्षात उतरविल्यास बेळगाव बाजारपेठेत एक नवी क्रांती घडेल. तसेच ही योजना कार्यरत होऊन यशस्वी झाल्यास तो इतर जिल्ह्यांसाठी आदर्श राहील, असेही रोहन जुवळी यांनी स्पष्ट केले.