शेतकऱ्यांची जमीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर कार्यालयासाठी ताब्यात घेऊन तब्बल 41 वर्षे झाली तरी संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई न दिल्यामुळे आज मंगळवारी न्यायालयाने प्रांताधिकारी कार्यालयावर जप्ती आदेश बजावला. त्यामुळे प्रांताधिकारी कार्यालयातील सर्व साहित्य आज रस्त्यावर आले होते.
न्यायालयाच्या जप्ती आदेशानुसार बेळगाव प्रांताधिकारी कार्यालयातील सर्व साहित्य आज मंगळवारी सकाळी बाहेर काढण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडून हा एक चर्चेचा विषय झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार पारिश्वाड (ता. खानापूर) येथील शेतकरी नागाप्पा चंद्रप्पा कुकडोळी यांची जमीन 1980 -81 झाली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी घेण्यात आली. त्यावेळी योग्य नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन दिल्यामुळे नागप्पा यांनी आपली जमीन हस्तांतरित केली होती.
मात्र आजतागायत नागाप्पा कुकडोळी याला नुकसान भरपाई मिळालेली नाही. नागाप्पा यांनी त्यानंतर न खचता कायदेशीर मार्गाने लढा दिला. त्यांच्या लढ्याला यश येण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. गेल्या 2019 साली न्यायालयाने नागप्पा कुकडोळी यांना नुकसान भरपाई दाखल 66 लाख रुपये देण्याचा आदेश बजावला होता. मात्र सदर रक्कम देण्यात आली नसल्यामुळे अलीकडे या रकमे बरोबरच व्याजही द्यावे असा आदेश न्यायालयाने बजावला होता.
बेळगावच्या तिसऱ्या उच्च दिवाणी न्यायालयाने दिलेल्या या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे बेळगाव प्रांताधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचा आदेश बजावण्यात आला होता. या आदेशाची आज मंगळवारी अंमलबजावणी करण्यात आली.
न्यायालयाच्या आदेशानुसार प्रांताधिकारी कार्यालयातील खुर्च्या टेबल आदी सर्व साहित्य आज जप्त करण्यात आले. या प्रकरणात शेतकर्यांच्या वतीने ॲड. महांतेश इनामदार आणि ॲड. विशाल पाटील काम पाहत आहेत.