केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हुबळी येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र मंजूर केलेल्या ट्विटचा अर्थ बेळगावातील केंद्र हुबळीला स्थलांतरित झाले असे नाही, असे स्पष्टीकरण देताना बेळगाव येथे देखील एप्रिल महिन्यापासून दोन वैमानिक प्रशिक्षण केंद्रांचे कामकाज सुरू होणार असल्याची माहिती सांबरा अर्थात बेळगाव विमानतळ प्राधिकरणाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने देशातील पाच विमानतळांवर सहा वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असून यापैकी दोन केंद्रं बेळगावातील सांबरा विमानतळावर सुरू केली जाणार आहेत. बेळगावात वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी संवर्धन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली यांच्याकडे कंत्राट देण्यात आले आहे.
बांधा, व्यवस्थापन आणि हस्तांतर (डीबीओएमटी) तत्त्वावर हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या दोन्ही कंपन्यांकडे प्रत्येकी 5 हजार चौ. मी. जमीन विमानतळ प्राधिकरणाने हस्तांतरित केली असून या ठिकाणी ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन स्थापण्यासाठीचे बांधकामही हाती घेण्यात आले आहे. 25 वर्षाच्या लिज अर्थात भाडे करार तत्वावर हे काम हाती घेण्यात आले असून जुलै 2021 मध्येच या बाबाचा करार करण्यात आला आहे.
या करारानुसार विमानतळ प्राधिकरणाने 247 मीटर लांब आणि 10.5 मीटर रुंद धावपट्टी निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. प्रशिक्षण संस्था आणि विमानतळाला ही धावपट्टी थेट जोडली जाणार आहे. हुबळी येथे मंजूर झालेले वैमानिक प्रशिक्षण केंद्र आणि बेळगावातील दोन्ही प्रशिक्षण केंद्राचा कोणताही संबंध नाही.
बेळगावातील प्रशिक्षण केंद्र हुबळीला मंजूर झालेले नसून ते बेळगावात निर्माण होत असल्याचेही विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी स्पष्ट केले आहे. एकंदर बेळगावसह उत्तर कर्नाटकातील वैमानिक बनू इच्छिणाऱ्या युवकांना भविष्यात सांबरा विमानतळावर वैमानिक प्रशिक्षणाचे धडे गिरवता येणार आहेत, हे आता निश्चित झाले आहे.