लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी ते जानेवाडी या रस्त्याची पार वाताहात झाली असून मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्याची तात्काळ योग्य प्रकारे दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी ते जानेवाडी या रस्त्याच्या दुरुस्ती आणि डांबरीकरणाकडे गेल्या बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात आले आहे.
परिणामी डांबरीकरण पूर्णपणे उखडला गेलेला हा रस्ता खाचखळग्यांनी भरून गेला आहे. पावसाळ्यामध्ये तर या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असते. सदर रस्त्याची झालेली वाताहात पाहता हा रस्ता दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.
सध्या या रस्त्यावर ज्या ठिकाणी खड्डे, सखल भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या दगडांची खडी पसरवून टाकण्यात आली आहे. तथापि यामुळे अपघाताचा धोका आणखीनच वाढला आहे. सदर रस्त्याकडे गेल्या कित्येक वर्षापासून या भागाच्या आमदारांसह खासदारांचे साफ दुर्लक्ष झाले असल्यामुळे बिजगर्णी आणि जानेवाडीसह आसपासच्या परिसरातील गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सदर रस्ता दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक बनत चालला आहे. तेंव्हा आता तरी लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जागे होऊन रस्त्याची युद्धपातळीवर व्यवस्थित दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.