सरकारी एपीएमसी भाजी मार्केट आणि जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केट ही दोन्ही मार्केट सुरू ठेवण्यास हरकत नाही. मात्र या मार्केटच्या वादातून राजकीय स्वार्थ साधला जाणार नाही याची काळजी घेऊन खाजगी भाजी मार्केटवर प्रशासक नेमण्याद्वारे शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्याध्यक्ष चिनाप्पा पुजारी यांनी केली.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. बेळगाव शहरातील सरकारी एपीएमसी भाजी मार्केट आणि नव्याने सुरू झालेले जयकिसान खाजगी होलसेल भाजी मार्केट या दोन्ही मार्केटना शेतकऱ्यांचा विरोध नाही.
दोन मार्केट झाल्यामुळे चांगला दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांसमोर पर्याय उपलब्ध असणार आहे. तेंव्हा ही दोन्ही भाजी मार्केट सुरू ठेवावीत. मात्र जय किसान खाजगी भाजी मार्केटवर प्रशासकाची नियुक्ती केली जावी. त्यांनी कृषी मालाचे वजन, दर आदींच्या बाबतीत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. भाजीपाल्याचा लिलाव शेतकऱ्यांचा समक्ष व्हावा, असेही पुजारी यांनी स्पष्ट केले.
सदर दोन्ही भाजी मार्केटमधील उद्भवलेला वाद लक्षात घेता. यामध्ये आम्हाला राजकीय स्वार्थाचा संशय येत आहे. तेंव्हा या दोन्ही भाजीमार्केटच्या बाबतीत पक्षीय राजकारणाला थारा दिला जाऊ नये. केंद्र सरकारसह राज्य सरकारने नवे कृषी कायदे मागे घेतले आहेत. मात्र एकंदर हालचाली पाहता आडमार्गाने या कायद्यांची बेळगावात अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे. तथापि हे खपवून घेतले जाणार नाही.
त्याला आमचा सक्त विरोध असेल, प्रसंगी त्यासाठी आम्ही आंदोलन देखील छेडू, असा इशाराही चिंनाप्पा पुजारी यांनी दिला. त्याप्रमाणे येत्या 18 व 19 जानेवारी रोजी कोलार येथे होणाऱ्या कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा मुद्दा आपण उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस शेतकरी नेते प्रकाश नाईक, राघवेंद्र नायक आदींसह रयत संघटनेचे अन्य पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.