गतिमंद मुलांना शिक्षणाबरोबरच दररोजच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे ज्ञान देण्यासाठी अंकुर स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन या शाळेतर्फे मुलांना वर्षभर नवे धडे देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ‘स्वतःचे काम स्वतः करावे’ हा मंत्र त्यांना आगामी वर्षभरात शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बेळगाव शहर आणि परिसरात गतिमंद मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या मुलांना शिक्षणाबरोबरच विविध प्रकारचे शिक्षण देण्यासाठी शहरातील आराधना शाळेसह अंकुर शाळा गेल्या कांही वर्षापासून प्रयत्न करत आहे. गतिमंद मुलांना (स्पेशल चाईल्ड) दररोज शिकवावे लागते. तेंव्हाच त्यांची बौध्दिक क्षमता कांही प्रमाणात वाढते.
मात्र कोरोनामुळे अनेक महिने इतर शाळांप्रमाणेच गतिमंद मुलांच्या शाळा देखील बंद राहिल्या. परिणामी मोठे कष्ट घेऊन शिकवण्यात आलेल्या अनेक गोष्टी गतिमंद मुले विसरल्याचे दिसून आले. त्यामुळेच अंकुर स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन या शाळेने पुन्हा विद्यार्थ्यांना दररोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील अशा गोष्टी शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
गतिमंद मुले दररोज घरी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पहात असतात. मात्र त्या गोष्टींचे प्रशिक्षण नसल्यामुळे दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणाऱ्या गोष्टी करण्याकडे ही मुले लक्ष देत नाहीत. त्यामुळेच अंकुर शाळेने गेल्या कांही दिवसांपासून गतीमंद विद्यार्थ्यांना चपाती बनविणे, भाजीपाला निवडणे अर्थात नीट करणे यासारखी घरात उपयोगी पडतील अशी कामे, घरगुती उपयोगाच्या विविध वस्तू बनविणे याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. आता या 2022 मध्ये वर्षभर त्यांना होम सायन्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अंकुर शाळेने घेतलेल्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसू लागले असून कांही दिवसातच अनेक विद्यार्थी चपाती बनविण्यासह स्वयंपाक योग्यप्रकारे बनवू लागल्याचे दिसून येत आहे. या मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन देखील केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, गतिमंद मुलांना दररोजच्या दैनंदिन जीवनात लाभदायक ठरतील अशा गोष्टींचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. चपाती करणे, भाजीपाला नीट करणे आदींसह होम सायन्सचे विविध प्रकार शिकवले जात आहेत. वर्षभर विद्यार्थ्यांना याचे धडे दिले जाणार आहेत. तसेच विविध स्पर्धांचे आयोजनही केले जाईल, अशी माहिती अंकुर शाळेच्या संचालिका गायत्री गावडे यांनी दिली.