Thursday, November 28, 2024

/

साडेपाच महिन्यानंतर पुन्हा आठवडाअखेर शुकशुकाट!

 belgaum

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने जारी केलेल्या विकेंड कर्फ्यूच्या आदेशामुळे सुमारे साडेपाच महिन्यानंतर पुन्हा शहर आणि उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर आज शनिवारी सकाळपासून शुकशुकाट पहावयास मिळाला. वीकेंड कर्फ्यूसह कोरोना नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलीस मात्र आज दिवसभर कार्यरत असल्याचे पहावयास मिळाले.

राज्यात सुमारे साडेपाच महिन्यानंतर पुनश्च वीकेण्ड कर्फ्यूचा आदेश जारी झाला आहे. काल शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून हा कर्फ्यु सुरू झाला असल्यामुळे आज शहर आणि उपनगरातील संपूर्ण बाजारपेठ बंद होती. शहरातील काकती वेस, खडेबाजार, रविवार पेठ, गणपती गल्ली, बापट गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, किर्लोस्कर रोड, कॉलेज रोड, बीम्स समोरील बी. आर. आंबेडकर मार्ग, शहापूर खडेबाजार, एसपीएम रोड, टिळकवाडीतील देशमुख रोड, काँग्रेस रोड, आरपीडी कॉर्नर आदी सर्व रस्त्यांवरील दुकाने बंद असल्यामुळे नेहमी गर्दीचे आणि वर्दळीचे असणारे हे रस्ते संचार बंदीमुळे आज सामसूम दिसत होते.

विवाह वगळता सर्व प्रकारचे व्यावसायिक उपक्रम, सरकारी आणि खाजगी शाळा, उद्याने सर्व प्रकारची कार्यालय, चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स थिएटर, रंगमंदिर, स्विमिंग पूल, जिम, धार्मिक स्थळे, मंदिरे वगैरे सर्व कांही बंद असल्यामुळे आज संबंधित ठिकाणी सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळत होता. औषध दुकाने डेअरीसह दूध विक्रीची दुकाने सुरू असली तरी त्या ठिकाणी नागरिकांची फारशी गर्दी पहावयास मिळत नव्हती. सर्व दैनंदिन व्यवहार बंद असल्यामुळे आज नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले होते. परिणामी नेहमी वाहनांची वर्दळ असणारे शहरातील राणी चन्नम्मा सर्कल, सम्राट अशोक चौक, बसवेश्वर सर्कल, गोगटे सर्कल आदी प्रमुख चौक आज वाहनांच्या रहदारी अभावी ओस पडले होते.

Weekend curfew
Photo:khade bazar Belgaum saturday weekend curfew

पोलीस प्रशासन मात्र विकेंड कर्फ्यूच्या काटेकोर अंमलबजावणीसह कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन होईल, याबाबतीत दक्ष असल्याचे दिसून आले. शहरात बऱ्याच ठिकाणी पोलिसांकडून फेसमास्क नियम भंग करणाऱ्यांविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली होती. परिणामी विना मास्क फिरणार्‍या नागरिकांना आज पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. आज सर्व दैनंदिन व्यवहार बंद असले तरी आपत्कालीन सेवा मात्र सुरू होत्या.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा हा पहिला वीकेंड कर्फ्यू आहे. दुसरी लाट एप्रिल ते जून पर्यंत सक्रिय होती. राज्यसरकारने शनिवार व रविवारचा कर्फ्यू रात्रीच्या कर्फ्यू सारखा कडक म्हणून अधिसूचित केला आहे. त्यामुळे 162 दिवसानंतर आता पुन्हा 55 तास कडक बंदोबस्ताची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.