अवकाळी पाऊस, रब्बी पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे भाजीची आवक मंदावली असून उपलब्ध होणारी भाजी चढ्या दराने विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे .
त्यामुळे भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून ते गगनाला भिडल्याचा अनुभव बेळगाव बाजारपेठेत येऊ लागला आहे. विशेषता सर्व प्रकारची भाजी 20 ते 40 वरून आता साठ रुपये ते 120 रुपये किलो या दराने विकली जात असून भेंडी ,कारली, फ्लॉवर, वाटाणे यासारख्या भाज्या मिळणेही दुरापास्त झाले आहे .
यासंदर्भात बेळगाव बेळगाव बाजारपेठेचा आढावा घेतला असता सध्या भाजीपाला मोठ्या प्रमाणात आणि मुबलक मिळण्याच्या काळातच भाजीचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाचे नुकसान झाले असून भाजीपाला व पिके शेतातच कुजून जाऊ लागले आहेत .
पिके काढून ती बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया मंदावली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता भाजी कशी पिकवायची आणि टिकवायची हा प्रश्न सतावत आहे. अशा परिस्थितीत एपीएमसी येतील मुख्य भाजी मार्केट ते बाजारपेठ असा तिचा प्रवास होताना क्विंटल मागे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
सहाशे रुपये ते बाराशे रुपये क्विंटल या दराने वेगवेगळ्या भाज्या मुख्य भाजी मार्केटमध्ये विकल्या जात असल्यामुळे त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे .60 रुपये ,80 रुपये, 90 रुपये अशा पद्धतीने रक्कम देऊन भाजी खरेदी करावी लागत असल्यामुळे परिस्थिती प्रचंड अवघड बनली असून ,भाजीपाला विकत घेणे कठीण आणि अवघड बनले आहे. सध्या कडधान्य आणि भाज्यांचे दर महागल्यामुळे स्वयंपाकाचा खर्चही वाढत चालला असून त्या प्रमाणात उत्पन्न मिळवण्याचे मार्ग बंद झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकाचे भोजन महागले आहे.
कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात गिऱ्हाईक मंदावल्यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला होता. सध्या तो नुकताच सुरू होण्याची परिस्थिती आलेली असतानाच भाज्यांचे दर वाढल्यामुळे हॉटेलमधील पदार्थांचे दर ही वाढू लागले असून हॉटेलमध्ये खाणे ही आता कितपत परवडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.