कर्नाटकची राजधानी बेंगलोर येथे कोरोनाचा नवा व्हेरीएंट ओमिक्राॅनचे दोन रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. या पद्धतीने राज्यात ओमिक्राॅनचा शिरकावा झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली असून ओमिक्राॅनचे रुग्ण आढळण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे.
आफ्रिका देशातून बेंगलोर येथे परतलेल्या दोघा जणांना ओमिक्राॅनची बाधा झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. या बाधित रुग्णांपैकी एकाचे वय 66 तर दुसऱ्याचे 46 वर्षे असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. संपूर्ण देशात कर्नाटकामध्ये अशाप्रकारे प्रथमच ओमिक्राॅन बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
‘ओमिक्राॅन’ला घाबरू नका!
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा व्हेरीएंट ‘ओमिक्राॅन’ याच्यामुळे सौम्य आजार होत असल्याचे दिसून आले आहे. आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. सर्व उत्परिवर्तन या विषाणूला जगण्यासाठी फायदेशीर नाहीत. या नव्या विषाणूमुळे संसर्गजन्यता वाढण्याची शक्यता असली तरी गंभीर आजाराचे कारण बनण्याची त्याच्यात क्षमता नाही.
त्यामुळे घाबरून न जाता सर्वांनी फेसमास्क वापरावा, सामाजिक अंतराचा नियम पाळावा आणि संपूर्ण लसीकरण करून घ्यावे. फक्त या गोष्टी ओमिक्राॅनसाठी गरजेच्या आहेत, असे शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर कोरोनाचे डॉ माधव प्रभू यांनी स्पष्ट केले आहे.