बेळगाव शहराचा पाणीपुरवठा एल अँड टी कंपनीकडे हस्तांतरित झाल्यानंतर अनेक अभिनव प्रयोग राबविण्यात येत असून त्यात आता नव्या ट्विटर हँडलची भर पडली आहे. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा किंवा पाणीपट्टी संदर्भातील आपल्या समस्या मांडण्यासाठी हे ट्विटर हँडल सुरू करण्यात आले आहे.
एल अँड टी कंपनीकडून बेळगाव महापालिका व कर्नाटकात पायाभूत सुविधा मंडळाच्या सहकार्याने या ट्विटर हँडलचे व्यवस्थापन केले जात आहे. त्यात पाणी पुरवठाशी संबंधित कार्यालयांचे संपर्क क्रमांक व अन्य माहितीही देण्यात आली आहे. बेळगाव शहरात पाणी गळतीची समस्या मोठी आहे. आता शहरवासीयांना त्याबाबतची माहिती ट्वीट करून एल अँड टी कंपनीला देता येणार आहे.
पाणीपुरवठ्याची संबंधित तक्रार कोणत्या क्रमांकावर करावी?, शहराच्या दक्षिण व उत्तर विभागाशी संबंधित संपर्क क्रमांक कोणते?, आहेत, 24 तास पाणी योजने बाबत तक्रार करण्यासाठी कोणते क्रमांक आहेत? याबाबतची माहिती तेथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ट्विटरचा वापर करणाऱ्या बेळगावकरांना तक्रार नोंदविण्यासाठी नवे व्यासपीठ मिळाले आहे.
प्रारंभी विस्कळीत कारभार करणाऱ्या एल अँड टी कंपनी गेल्या महिन्याभरापासून पाणीपुरवठ्यात सुधारणा केली आहे. पाणीपट्टी ऑनलाइन भरण्याची सुविधा कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. पाणीपुरवठा मंडळानेही ऑनलाइन व एटीएमच्या माध्यमातून पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. घरोघरी जाऊन ईडीसी मशीनच्या माध्यमातून ही पाणीपट्टी वसूल केली जात होती.