जैन बस्तीचा दरवाजा तोडून चोरटयांनी ६ लाख चे सोन्या–चांदीचे दागिने आणि देवतांच्या मूर्तींसह दानपेटीही लांबविल्याची घटना घडली आहे.
गांधीनगरातील शांतीनाथ जैन बस्तीत चोरीची ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास लोखंडी रॉडने दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरटयांनी बस्तीतील पद्मावती, ज्वालामालिनी, अष्टमंगल आदी सुमारे ५ ते ६ लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या मूर्ती चोरल्या.
बस्तीमधील हुंडीदेखील चोरटयांनी लांबवली आहे. दिशाभूल करण्यासाठी मंदिरातील अन्य मूर्ती आणि शिळा विग्रहांना हळदीची बोटे ओढण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकरणाला जातीय वळण देण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. पद्मश्री अनगोळकर यांनी माहिती देताना यापूर्वी या बस्तीत कधीही असे दुष्कृत्य घडले नव्हते.
मानसस्तंभाला हळदीची बोटे उठवून मुख्य मूर्ती सोडून अन्य मूर्ती आणि दानपेटी चोरली आहे. आमच्या देवतांच्या मूर्ती आम्हाला पोलिसांनी परत मिळवून द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात बोलताना उदय पद्मन्नावर म्हणाले, पहाटेच्यावेळी अज्ञात चोरटयांनी आमच्या देवतांच्या मूर्ती चोरल्या आहेत. हुंडीही पळवली आहे. लवकरात लवकर त्या शोधून दिल्या पाहिजेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथकाद्वारे चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. डीसीपी डॉ. विक्रम आमटे, एसीपी सदाशिव कट्टीमनी, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळीही भेट देऊन पाहणी केली. यासंदर्भात माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.