उशिरा का होईना हिरवेगार मोकळे वातावरण आणि पक्ष्यांचा सहवास यामुळे मंडोळी -खादरवाडी गावांच्या सीमेवर असलेल्या टेकडीवरील श्री बसवांना मंदिर परिसर सध्या निसर्गप्रेमींचे आकर्षण आणि सहलीसाठी परिपूर्ण ‘पिकनिक स्पॉट’ ठरला आहे. या ठिकाणी निसर्गप्रेमींसह पक्षी निरीक्षक, हौशी फोटोग्राफर आणि इतरांची गर्दी होताना दिसत आहे.
पूर्वीच्या काळी लोकांना हिरव्यागार निसर्गरम्य स्थळांची माहिती असायची. मात्र अलीकडे सोशल मीडियावरील प्रचारामुळे मंडोळी -खादरवाडी गावांच्या सीमेवर असलेल्या टेकडीवरील श्री बसवांना मंदिर परिसर लोकप्रिय झाला आहे. हा परिसर समूहाने लोकांना आकर्षित करत असून रविवारी आणि सुटीच्या दिवशी या ठिकाणी विशेष गर्दी पहावयास मिळते. या टेकडी जवळच राहणाऱ्या कृष्णा पाटील यांनी अलीकडे पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देत असल्याचे सांगितले.
ही मंडळी पहाटे पहाटे येतात आणि दुपारपर्यंत माघारी जातात. नागरिक आपल्या कुटुंबासमवेत गटागटाने श्री बसवांना मंदिराच्या ठिकाणी या टेकडीवर सहलीसाठी येतात. या लोकांसमवेत कांही बसवांना भक्त देखील आहेत जे कायम या ठिकाणी येत असतात, असे पाटील यांनी सांगितले.
टेकडीवरील श्री बसवांना मंदिर हे खादरवाडी गावाच्या हद्दीत आणि मंदिरानजीकचा धबधबा व तळे मंडोळी गावाच्या हद्दीत येते. टेकडीवरील तलाव हा नेहमी पाण्याने भरलेला असल्यामुळे तो एक चमत्कार मानला जातो, अशी माहिती बाळू पाटील या अन्य एका गृहस्थाने दिली. टेकडीवरील प्रदेश झाडाझुडपांचा वनस्पतींनी व्यापलेला असल्यामुळे तो विविध प्रजातींच्या पक्ष्यांना आकर्षित करतो.
याठिकाणी किडे आणि आळ्या खाण्यासाठी या ठिकाणी पक्षी मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून असतात. त्यामुळे या रंगीबेरंगी पंखांच्या पक्ष्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी याठिकाणी अलीकडे हौशी छायाचित्रकारांची गर्दी होत असते, अशी माहितीही बाळू यांनी दिली.