बेळगाव येथील सांडपाणी प्रकल्प प्रकरणी बेंगलोर येथील उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज सुनावणी झाली. इतके दिवस आपली बाजू मांडण्यास दुर्लक्ष करणाऱ्या महानगरपालिकेने आता या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
न्यायालयाच्या सूचनेनुसार लोकायुक्त विभाग यांनी या प्रकरणातील एकंदर चौकशी केली असून त्याचा अहवाल पुढील तारखेला दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत आणि इतर चार जणांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज सुनावणी झाली. महानगरपालिकेने आपली बाजू न मांडल्यामुळे यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाने महानगर पालिका आयुक्तांना पाच हजार रुपयांचा दंड केला होता.
या प्रकल्पासाठी भूसंपादन झाले त्या ठिकाणी खर्च करण्यात आला असताना पुन्हा सांडपाणी प्रकल्पासाठी नव्या जागेचे भूसंपादन का? असा प्रश्न विचारून ही याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून महानगरपालिकेने आपले प्रतिज्ञापत्र आता न्यायालयासमोर सादर केले आहे.
एकंदर प्रकरणात भ्रष्टाचाराचा वास येत असल्यामुळे लोकआयुक्त विभागाने याची चौकशी करण्याचे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले होते. या संदर्भातील चौकशी झाली असून अहवाल सादर केला जाईल. असे लोकायुक्त विभागाने सांगितले आहे. त्यामुळे या जनहित याचिकेच्या पुढील सुनावणी कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.