हलगा मच्छे बायपास प्रकरणी झगडणाऱ्या शेतकऱ्यांना आणखी एक दिलासा सन्माननीय न्यायालयाने दिला आहे. या बायपासच्या कामाला 25 जानेवारीपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला असून यामुळे शेतकऱ्यांना एक बळ प्राप्त झाले आहे .
हलगा मच्छे बायपासला आमची सुपीक जमीन देत नाही .यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग प्राधिकरणाला नमते घ्यावे लागले. सुपीक जमिनी पीक उद्ध्वस्त करून बायपास करण्याच्या एकंदर प्रयत्नाला न्यायालयाने प्रारंभीच स्थगिती दिली होती. ही स्थगिती आता 25 जानेवारी पर्यंत वाढविण्यात आल्यामुळे आम्हाला न्याय मिळाला अशी भावना बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी व्यक्त केली आहे.
बेळगाव येथील पथकाने केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्या बायपास संदर्भातील आपली समस्या मांडली होती. त्यावेळी आपण जानेवारी महिन्यात बेळगाव येथे दाखल होऊन त्या बायपासची पाहणी करणार आहोत. तसेच शेतकऱ्यांची भेट घेणार आहोत. असे आश्वासन त्यांनी दिले होते.
आता नितीन गडकरी यांच्या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांना एक नैतिक बळ प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. अशोका या कंपनीने हलगा मच्छे बायपासचे काम सुरू केले त्याला शेतकर्यांनी विरोध करताच पोलिसांना पाचारण करून दडपशाही करण्यात आली.
मात्र न्यायालयात शेतकऱ्यांना दिलासा आणि बळ मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे.