केंद्र शासनाकडून नुकतीच 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणास मंजुरी देण्यात आली असल्यामुळे येत्या 3 जानेवारीपासून जिल्ह्यात या लसीकरणाला चालना देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 6 लाख शालेय व महाविद्यालयीन मुलांना लस दिली जाणार आहे.
मुलांसाठीच्या या लसीकरण मोहिमेला येत्या 3 जानेवारी रोजी राज्यस्तरावर मुख्यमंत्री बसवराज मुंबई यांच्या हस्ते तर जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते चालना दिली जाईल.
सदर लसीकरणासाठी राज्य आणि जिल्हा पातळीवर व्यापक तयारी करण्यात येत आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये 15 ते 18 वर्षे वयोगटातील शालेय आणि विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 6 लाख आहे. या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण केंद्रामध्ये लस उपलब्ध असणार आहे.
लसीकरण केंद्राबरोबरच शाळा व महाविद्यालयांमध्ये तारीख निश्चित करूनच देण्याबाबतचे नियोजन आहे. त्यासाठी शिक्षण खात्याला यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मुलांची यादी तयार करण्याबाबतही सूचना देण्यात आली आहे. दरम्यान, बेळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 63 लाख 99 हजार 624 जणांचे लसीकरण झाले आहे.
या सर्वांपैकी 35 लाख 28 हजार 452 जणांनी पहिला डोस तर 28 लाख 71 हजार 172 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. यामध्ये वैद्यकीय कर्मचारी, कोरोना योद्धे, 18 ते 44 वयोगटातील नागरिक आणि 45 वर्षावरील नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे जवळपास 75 ते 85 टक्के या दरम्यान लसीकरण झाल्याचे मानले जात आहे.