कर्नाटक भाजपने आणखी कांही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा अध्यक्ष, पक्षाचे उपाध्यक्ष, निमंत्रक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नवीनकुमार कटील यांनी काल रविवारी पक्षाच्या विविध जबाबदाऱ्यांवर नियुक्तीचे आदेश दिले. त्यानुसार माजी उपमुख्यमंत्री अथणी बेळगावचे लक्ष्मण सवदी यांच्याकडे कर्नाटक प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
विधानपरिषद सदस्य लक्ष्मण सवदी यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी सवदींना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या बदलामुळे लक्ष्मण सवदी यांना उपमुख्यमंत्री (डीसीएम) पद गमवावे लागले होते. आता सवदी यांना प्रदेश उपाध्यक्षपद मिळाले आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना 2018 च्या विधानसभा निवडणुकीत अथणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा महेश कुमठळ्ळी यांनी पराभूत केले होते.
राज्यातील भाजपमधील काहींसाठी ते धक्कादायक होते. तसेच सवदिना पराभवानंतरही मिळालेले उपमुख्यमंत्रीपद सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे होते.
17 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या निवडणुकीत विजय मिळवून त्यांनी मंत्रीपद मिळवले होते. बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या सवदी यांच्याकडे आता कर्नाटक प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.