‘मंत्री येति गावा तोचि दिवाळी -दसरा’ या उक्तीची प्रचिती आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता बेळगावकरांना येऊ लागली आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्रीगण व मान्यवर बेळगावात येणार असल्यामुळे सध्या रस्ता दुरुस्तीसह अन्य विकास कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत.
राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशन येत्या 13 ते 24 डिसेंबर पर्यंत बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे होणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांसह राज्याचे सर्व मंत्रीगण, आमदार -खासदार बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे या पाहुण्यांसमोर आपले हसे होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. यासाठी रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरणास अन्य विविध विकास कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत.
सध्या प्रशासनाकडून शहरातील खड्डे पडलेल्या प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने एपीएमसी रोड बसवण मंदिर ते आझमनगर रस्त्याचेही डांबरीकरण केले जात आहे.
मात्र हे डांबरीकरण उत्कृष्ट दर्जाचे व्हावे यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी जातीने लक्ष घातले आहे. ते स्वत:हून डांबरीकरण चांगल्या प्रकारे केले जाईल याकडे लक्ष ठेवून आहेत मागील वर्षी महाराष्ट्राचे डांबरीकरण केले होते पण, पावसामुळे रस्ता पुन्हा खराब झाला होता.
खराब रस्त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्या होत्या. फक्त अधिवेशन काळापुरता एखादा रस्ता मजबूत राहून उपयोग नाही तर तो ये -जा करणाऱ्यांसाठी कायमचा चांगला झाला पाहिजे, असे समाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी सांगितले. यावेळी महापालिका अभियंत्यांसह कंत्राटदार विजय धामनेकर, आकाश कुडोळकर आदी उपस्थित होते.