बेंगलोर येथे छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी आज शनिवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर वाणीक्याळ यांच्याकडे सादर केले. त्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
सदाशिवनगर बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचा निंद्य प्रकार घडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या राष्ट्रीय नायकाचा हा अवमान नसून समस्त हिंदू धर्मीयांचा आणि देशाचा अवमान आहे.
पुतळा विटंबनेचे हीन कृत्य करून न थांबता त्या समाजकंटकांनी त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल केला आहे. परिणामी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातच नाही तर संपूर्ण देशातील हिंदू धर्मीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी लढले. त्यांच्या पुतळ्यांची विटंबना म्हणजे त्यांच्या शौर्याचा अनादर आणि त्यांच्यासह संपूर्ण देशाचा अवमान झाल्यासारखे आहे.
तरी याची गांभीर्याने दखल घेऊन शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ गजाआड करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. त्याचप्रमाणे सायबर पोलिसांनी व्हायरल झालेला पुतळा विटंबना व्हिडिओची चौकशी आणि तपास करून त्या समाजकंटकांचा छडा लावावा व त्यांना कडक शासन करावे, अशा आशयाचा तपशील माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.