कर्नाटक सरकारने खाटीक समाजाला मागास जातीमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी अखिल कर्नाटक हिंदू खाटीक समाजातर्फे सरकारकडे करण्यात आली असून त्यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे.
आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी अखिल कर्नाटक हिंदू खाटीक समाजातर्फे आज गुरुवारी सुवर्ण विधानसौध समोरील आंदोलनस्थळी धरणे सत्याग्रह करण्यात येत आहे. सदर धरणे आंदोलनात बेळगावसह राज्यभरातील खाटीक बांधव सहभागी झाले असून आपल्या समाजाचा मागासवर्गीय जातीत समावेश करावा या मागणीसाठी या सर्वानी जोरदार निदर्शने केली.
खाटीक समाजाचे राज्याध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये खाटिक समाजाच्या महिला देखील सहभागी झाल्या होत्या.
याप्रसंगी बोलताना अखिल कर्नाटक हिंदू खाटीक समाजाचे राज्याध्यक्ष अजित पवार यांनी देशातील 13 राज्यांमध्ये खाटीक समाजाला मागासवर्गीय घोषित करून मागास जातीचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतीत कर्नाटकामध्ये मात्र खाटिक समाजावर घोर अन्याय झाला असून या ठिकाणी आम्ही सवर्ण समाजात आहोत.
तेंव्हा आम्हाला देशाच्या इतर राज्यांप्रमाणे कर्नाटकात देखील मागासवर्गीय म्हणून घोषित करावे आणि न्याय द्यावा. गेली 15 वर्षे आम्ही न्याय मिळावा म्हणून संघर्ष करीत असून अद्याप आमच्या समाजाला न्याय हक्कापासून वंचित राहावे लागत आहे.
यासाठी आम्ही अधिवेशनावेळी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडले आहे असे सांगून जर आमच्या मागणीची पूर्तता झाली नाही तर आम्ही आमरण उपोषण सुरू करणार आहोत, अशी माहिती पवार यांनी दिली.