हिवाळी अधिवेशनात पोलीस व्यस्त झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात त्यांना अपयश येऊ लागले आहे. याचा फटका म्हणून पोलीस अधिवेशनात व्यस्त तर बेळगाव शहराच्या लगतचा ग्रामीण भाग चोरीच्या घटनांनी त्रस्त असा प्रकार पाहायला मिळाला आहे.
परवाच तारिहाळ गावात बारा ते पंधरा लाखाची चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच आज हांगरगा येथेही घराच्या पाठीमागचा दरवाजा तोडून दुपारच्यावेळी दागिन्यांची चोरी व रोख रक्कम लंपास करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पोलिसांना वेळ नाही आणि चोरटे कार्यरत झाले आहेत हाच प्रकार पाहायला मिळत आहे .
विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी सर्व पोलीस स्थानकाचे पोलीस व्यस्त झाले आहेत .अशा परिस्थितीत नागरिकांची सुरक्षा कोण करणार हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हंगरगा येथील नामदेव कडोलकर यांच्या घरी चोरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सध्या ग्रामीण भागामध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे. हंगरगा गावाबाहेर घर असून मुख्य रस्त्याला आहे.
पाठीमागचा दरवाजा तोडून दुपारच्या दरम्यान चोरी करण्यात आले असून आठ तोळे सोने आणि सत्तर ते ऐंशी हजार रोख रक्कम चोरण्यात आले आहे. त्यामुळे आता नागरीक कितपत सुरक्षित हा मुद्दा उपस्थित झाला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना वाढीव काम लागले असले तरी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काही पोलिस तैनात करावेत. अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
ग्रामीण भागात अनेक निर्मनुष्य रस्ते तसेच गावाबाहेर घरे असतात अशा ठिकाणी चोरटे आपला कार्यभाग साधत आहेत. त्यावेळी चोरी घडल्यानंतर पोलिस दक्ष होतील असा विश्वास नागरिकांना होता मात्र पोलिसांना हिवाळी अधिवेशनाचे काम मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे आता या चोऱ्या निवारण्यासाठी काय प्रयत्न करावे असा प्रश्न नागरिकांसमोर पडला आहे.