छ. शिवाजी महाराज आणि वीर संगोळी रायण्णा यांचा पुतळा विटंबनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली असून शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
शहरातील संवेदनशील भागातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून मंदिरे आणि प्रार्थना स्थळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील लाल-पिवळ्या ध्वजासह अन्य सरकारी कार्यालयासमोरील ध्वजांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
बेंगलोर येथे छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना आणि त्यापाठोपाठ वीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा संतापजनक प्रकार घडल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलीस सतर्क झाले असून शहरातील पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.
संवेदनशील भागात पोलीस व्हॅन सज्ज ठेवण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेसमोरील लाल-पिवळ्या ध्वजाला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
शहरातील मंदिरे, चर्च, मशिदी आदी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. बेळगावात सध्या कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून ते येत्या 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरात आधीच अडीच हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
आता पुतळा विटंबनेच्या घटनांनंतर निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे या पोलिस बंदोबस्तात आणखी भर घालून तो वाढविण्यात आला आहे. परिणामी शहराला विशेष करून संवेदनशिल भागांना पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.